रंग दे बसंती उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न -प्राचार्या जयश्री मेहेत्रे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रंग दे बसंती या उपक्रमातंर्गत विविध आंतरशालेय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन तक्षीला स्कूल मार्फत केले जाते. हा उपक्रम प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी प्राचार्या मेहेत्रे म्हणाल्या की, रंग दे बसंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील आवड निवडीनुसार या स्पर्धा दरवर्षी रंगत असल्याचे स्पष्ट केले. तर दरवर्षी विद्यालयात होणाऱ्या रंग दे बसंतीच्या विविध स्पर्धांच्या मेजवानीची सर्व शाळांतील विद्यार्थी आतुरतेने वाट बघत असतात. दरवर्षी या उपक्रमास मिळणारा उदंड प्रतिसाद, जणू उत्तम प्रकारे स्पर्धांच्या नियोजनाची पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावर्षी उत्कर्ष आणि मुलांमधील क्षमतांना वाव या थिमवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत शहरातील 14 शाळांचे साडेतीनशे विद्यार्थी यांनी शिक्षकांसह सहभाग नोंदवला. यावेळी 18 स्पर्धा पार पडल्या. यामध्ये ऍड मेकिंग, सॅलड डेकोरेशन, फॅशन मेनिया, क्ले मोल्डींग, स्टोरी टेलिंग, फ्लेमलेस कुकिंग, ज्यूट आर्ट, पॉप टॉक, रिदीमिक योगा, मेकिंग म्युजिकल इन्स्ट्रूमेंट, युझिंग वेस्ट मटेरियल, वुलन आर्ट, मॉडेल मेकिंग, मोनो ॲक्ट, पेंन्टिंग, मॅशप डान्स, वक्तृत्व स्पर्धा, डिजीटल पॉवर पॉइंट, शुट राईट आऊट क्वीज या स्पर्धांचा समावेश होता. एकाच वेळी सर्व विभागात या स्पर्धा नियोजनबद्धरीत्या पार पडल्या. स्पर्धेच्या प्रारंभी सर्व निमंत्रितांचे स्वागत करून, परीक्षकांचा परिचय करुन देत त्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून अनुक्रमे आर.जे. प्रसन्ना, तुषार शिंदे, शुभदा डोळसे, दिपाली देऊतकर, अँथनी डिसोजा, मृदुला पाटोळे, आकांक्षा गांधी, मानसी पाटोळे, उमेश झोटिंग, राम पांढरे, अजय अपूर्वा, डॉ. शुभांगी मोहारेकर, शशिकांत नजान, योगेश हराळे,अभिजीत दळवी,आश्लेषा पोतदार, प्रबंधिका शेलार, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तक्षिला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.