रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अपमानित केल्याने राहुरीच्या केंद्रप्रमुखाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्याचे केंद्रप्रमुख अशोक शेळके यांना अपमानित केल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा आरोप करुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात मिशन आरंभच्या नावाखाली तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचा सुरु असलेला मानसिक छळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन रिपाई ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. याप्रसंगी रिपाई वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, शेखर पंचमुख, अतुल भाऊ, अजय बडोदे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाची परवानगी न घेता इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात न घेता जिल्ह्यात मिशन आरंभ हा प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला आहे.
यामुळे लहान मुलांचा मानसिक छळ होत आहे. मुलांना पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीचे शिक्षण देऊन त्यांच्यासाठी सराव परीक्षेची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. या परीक्षेमध्ये निकाल कमी लागला म्हणून राहुरी तालुक्यातील केंद्रप्रमुख अशोक शेळके यांना सर्वांसमक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपमानित केल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचे निधन झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
स्वतःचे नाव करण्यासाठी लहान मुलांचा छळ सुरु आहे. मुलांच्या मानसिकतेचा विचार न करता सरसकट तिसरी व चौथीच्या मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकून मिशन आरंभ या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. बाळ मनावर दडपण घेऊन त्यांचा छळ होत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.