• Fri. Mar 14th, 2025

अखेर भाऊसाहेब कचरे यांचे माध्यमिक शिक्षक सोसायटीतील सभासदत्व रद्द

ByMirror

Aug 1, 2024

सेवानिवृत्त झालेल्या तिन्ही माजी संचालकांवर कारवाईचा बडगा

कारवाईने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी मधील माजी संचालक भाऊसाहेब कचरे, राजेंद्र सोनवणे व पुंडलिक बोठे या तिघांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काढले आहे. तिन्ही माजी संचालक हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असताना देखील सोसायटीच्या कारभारात लुडबुड करत असल्याची तक्रार विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करुन त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. अखेर कचरे यांच्यासह दोन्ही माजी संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मागील आठवड्यात दोन संचालकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सदरील तिन्ही माजी संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब कचरे 31 मे 2022, राजेंद्र सोनवणे 31 मे 2023 व पुंडलिक बोठे 30 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त झालेले आहेत. संस्थेच्या घटनेच्या उपविधीनुसार ज्या दिवशी शिक्षक निवृत्त होतो, त्याच दिवशी त्याचे सभासदत्व रद्द होत असते. परंतु या तिन्ही माजी संचालकांनी सेवानिवृत्तीनंतर देखील आपला हस्तक्षेप संस्थेत चालू ठेवला होता. याप्रकरणी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे व वसंत खेडकर यांनी त्यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करुन, सेवानिवृत्त झालेले तिन्ही माजी संचालक संस्थेच्या घटनेचे उल्लंघन करुन संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता. तर संस्थेच्या घटनेनुसार तिन्ही माजी संचालकांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली होती.


या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तसेच संस्थेच्या मंजूर उपविधीतील तरतुदीस अनुसरून कचरे, सोनवणे व बोठे यांचे सभासदत्व संपुष्टात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी पत्रात म्हंटले आहे. तर याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी पत्र सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापकांना काढून याप्रकरणी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट केले आहे.


सभासदत्व रद्दची कारवाई झालेले भाऊसाहेब कचरे यांच्यासह दोन्ही माजी संचालकांनी निवृत्तीनंतरही लाभांश, ठेवीवरील व्याज, पुरोगामी आवर्ती ठेवी वरील 9 टक्के दराने व्याज घेत आहे. निवृत्तीनंतरही सभासदांचे संस्थेत काय काम? या संबंधीत दोन संचालकांनी फुटून पुरोगामी मंडळ स्थापन केले होते. त्याकाळी भोसले व मरकड सर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते. आज देखील सेवानिवृत्त झाल्यानंतरही काही माजी संचालक संस्थेच्या कारभारात लुडबुड करत आहे. शेवटी त्यांचे सभासदत्व रद्द झाल्याने त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. -आप्पासाहेब शिंदे (विरोधी संचालक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *