पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हजेरीने चित्रपटगृह हाऊसफुल
शिक्षण कसे असावे? याचा आदर्श कर्मवीरांनी घालून दिला -ज्ञानदेव पांडुळे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या व शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या दारा पर्यंत पोहचविण्याचे कार्य केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रावर प्रदर्शित झालेला कर्मवीरायण चित्रपट लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. बिकट परिस्थितीत स्वत:च्या जीवनातील सुख-दु:खांचा त्याग करुन कर्मवीरांनी उभी केलेली शिक्षण संस्था, रयत सेवक म्हणून झटताना घडवलेले विद्यार्थी हा कर्मवीरांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी चित्रपटातून अनुभवला.

कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिकचे विद्यार्थी मंगळवारी (दि.30 जुलै) शहरातील आशा स्क्वेअर चित्रपट गृहात दाखल झाले होते. पहिल्याच दिवशी मुलांच्या गर्दीने चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचा फलक झळकला.
बालपणातच महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज त्यानंतर युवा अवस्थेत महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा घेतलेला निर्णय, समाजात वर्चस्ववादाचा बिमोड करुन गरीब आणि बहुजनांच्या मुलांना उपलब्ध केलेली शिक्षणाची संधी, स्वालंबी शिक्षण हेच ब्रीद घेऊन खेडोपाडी शिक्षणाची गंगा घेऊन पोहोचलेले कर्मवीरांचा प्रेरणादायी व थक्क करणारा प्रवास विद्यार्थ्यांनी अनुभवला.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, प्रदीप पालवे, अमित धामणे, मंगेश कारखिले आदींसह शिक्षक उपस्थित होते.
शिवाजी लंके म्हणाले की, कर्मवीर अण्णा यांचा शिक्षणासाठी असलेला त्याग आजच्या समाजाला व नवीन पिढील कळणे गरजेचे आहे. कर्मवीरांचा चित्रपट आजच्या विद्यार्थ्यांना स्फुर्ती देणारा ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, कर्मवीरांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजले तर सक्षम नागरिक म्हणून विद्यार्थी घडणार आहे. शिक्षण कसे असावे? याचा आदर्श कर्मवीरांनी घालून दिला. दूरदृष्टी ठेऊन त्यांनी दिलेला कमवा व शिका हा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरक ठरत आहे. शिक्षणाने समाजात समानता निर्माण करण्याची क्रांती त्यांनी घडविली असल्याचे त्यांनी सांगितले.