• Sat. Mar 15th, 2025

बाराबाभळीच्या शहीद स्मारकावर माजी सैनिकांकडून कारगिलचा विजय दिवस साजरा

ByMirror

Jul 30, 2024

शहिदांना अभिवादन करुन वीर माता-पिता, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान

हा विजय प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा -डॉ. सुधा कांकरिया

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथे माजी सैनिकांनी स्वत:च्या पेन्शन मधून उभारलेल्या शहीद स्मारक येथे माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कारगिलचा रौप्य महोत्सवी विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत माता की जय…, वंदे मातरम…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह माजी सैनिक, वीर माता-पिता, वीर पत्नी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी शहीद स्मारकावर पुष्प वाहून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सुधा कांकरिया व पंचायत समिती सभापती सुनिता दौंड यांच्या हस्ते वीर माता-पिता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघ, अध्यक्ष रामदास गुंड, सचिव सिकंदर शेख, सहसचिव संजू ढाकणे, कार्याध्यक्ष कुंडलिक ढाकणे, सहकोषाध्यक्ष ईशवर गपाट आदींसह सर्व सल्लागार व विश्‍वस्त उपस्थित होते.


डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की, कारगिलचा विजय दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. 26 जुलै या दिवशी भारतीय जवानांनी आपल्या सिमेत दाखल झालेल्या पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकवला. हा विजय प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा व देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांची आठवण करुन देत असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थापक अध्यक्ष तथा मेजर संजय वाघ म्हणाले की, कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय सुरु केला. जवळपास 60 दिवसांपेक्षा जास्त हे युद्ध सुरु होते. उंच पर्वतरांगा, कठोर हवामानाचा सामान करत 26 जुलै 1999 ला भारताने पाकिस्तानचा पराभव करत कारगिल युद्ध जिंकले. कारगिल युध्दात भारतीय सैन्याचे 500 पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. तर एक हजारपेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. या जवानांच्या शौर्याने हा विजय दिवस भारतीयांना पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शवन साळवे, शंकर कराळे, तांदळे, गंगावणे, खोमणे, खराडे, पोटे, आर्ले, शरद खडके, वसंत शेळके, बाळु घागरे, वारे, सातपुते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *