जय युवा अकॅडमीचा उपक्रम
प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे -ॲड. सुरेश लगड
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे. समाजाप्रती आपण देणे लागतो, असे समजून समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य करावे. तरच खऱ्या अर्थाने समाजकार्य घडेल, असे प्रतिपादन जिल्हा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी केले.
जय युवा अकॅडमीच्या वतीने गुलमोहर रोड येथील भिमा गौतमी विद्यार्थीनी आश्रमच्या (वस्तीगृह) मुलींसाठी अन्न-धान्याची मदत देण्यात आली. सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले ॲड. महेश शिंदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ॲड. लगड बोलत होते. यावेळी डॉ. अमोल बागुल, आपचे दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे राजकुमार चिंतामणी, रामेश्वर राऊत, अविनाश काळे, अविनाश पठारे, रावसाहेब काळे, दत्ता वामन, फिनिक्सचे जालिंदर बोरुडे, आधारवड संस्थेच्या ॲड. अनिता दिघे, जीवन आधार संस्थेचे सुभाष जेजुरकर, माहेरच्या रजनी ताठे, समर्पण संस्थेच्या कांचन लद्दे, समग्र परिवर्तनचे चंद्रकांत पाटोळे, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, आनंद वाघ, उडाण फाउंडेशनच्या आरती शिंदे, रयतचे पोपट बनकर, अशोक कासार, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, सुहास सोनवणे, जय युवाच्या जयश्री शिंदे, जयेश शिंदे, शिवाजी वेताळ आदी उपस्थित होते.
डॉ. अमोल बागुल म्हणाले की, जय युवाच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ते घडवून गरजूंना आधार देण्याचे सातत्याने कार्य सुरु असून, गेल्या वीस वर्षापासून सामाजिक संस्थांचे जाळे तयार करुन शेवटच्या घटकापर्यंत मदत घेऊन जाण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सूर्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कायद्याची पुस्तके देऊन ॲड. शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक चळवळीतून सर्वसामान्य घटकांना आधार मिळत आहे. जय युवा अकॅडमी सामाजिक संवेदना जागृक ठेऊन कार्य करत असल्याचे राजकुमार चिंतामणी यांनी सांगितले. भीमा गौतमी वस्तीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव यांनी जय युवा अकॅडमी व इतर संलग्न असलेल्या संस्थांनी नेहमीच वस्तीगृहाच्या मुलींसाठी विविध रुपाने मदत केल्याचे सांगून, अन्न-धान्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, प्रत्येकाने समाजातील वंचित घटकांसाठी योगदान देणे हे कर्तव्य आहे. विविध सण, राष्ट्रीय उत्सव, समाजसुधारकांची जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस व विवाहाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत केली पाहिजे. समाज परिवर्तनाच्या भूमिकेत सहभाग दिल्यास वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले.