कोरोनामध्ये पितृछत्र हरपलेली श्वेताली मगरचे सीए परीक्षेत यश
युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल केल्यास यश निश्चित -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- सीए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींचा आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कोरोनामध्ये पितृछत्र हरपलेली श्वेताली मगर व सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रणाली सुसे व शालोम पारधे यांनी सीए परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्याबद्दल श्री विशाल गणपती मंदिर देवस्थानचे विश्वस्त तथा शहर बँकेचे संचालक प्रा. माणिक विधाते यांनी त्याचा सत्कार केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी बॅडमिंटनचे प्रशिक्षक किरण पवार, सीआयडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर, पंडितराव खरपुडे, अशोक कानडे, उद्योजक सचिन सुसे, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे अमित खामकर, शिव व्याख्याती प्रणाली कडूस आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या युवक-युवतींनी सीए परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तर मगर हिचे पितृछत्र हरपलेले असताना देखील तिने संपादन केलेले यश प्रेरणादायी आहे. युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते.
होतकरु विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप नेहमीच प्रोत्साहन व आधार देण्याचे काम करत आहे. या विद्यार्थ्यांचे यश शहरासाठी अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सत्काराने सीए उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील भारावले. तर पाठीवरती दिलेली शाबासकीची थाप जीवनात आनखी पुढे जाण्यास प्रेरणा देणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
