जय हिंदची वृक्ष क्रांती चळवळ उज्वल भविष्याची नांदी ठरणार -वैभव खलाटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने शिराळ (ता. पाथर्डी) येथील राम मंदिर व जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगर रांगा, उजाड माळरान, टेकड्या, मंदिर व शालेय परिसरात वृक्षारोपण अभियान सुरु असून, या उपक्रमंतर्गत झाडांची लागवड करण्यात आली.

पाथर्डी बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, पाथर्डी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर, चेअरमन हनुमंत घोरपडे, पंढरीनाथ तुपे गुरूजी, संजय महाराज मुळे, बळी काका घोरपडे, विष्णू तात्या घोरपडे, संजय तुपे, पोलिस पाटील दत्तात्रय घोरपडे, दत्तात्रय गडाख, प्रमोद घोरपडे, रावसाहेब कराळे, दिनकर घोरपडे, महादेव आघवणे, लक्ष्मण पुरी, अशोक पुरी, सुरेश घोरपडे, अशोक कराळे, सतीश घोरपडे, निखिल घोरपडे, विराज घोरपडे, अथर्व घोरपडे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, श्रीनाथ काकडे, सदाशिव घोरपडे आदी उपस्थित होते.
वैभव खलाटे म्हणाले की, जिल्ह्याला हरित करण्याचा जय हिंद फाऊंडेशनचा संकल्प प्रेरणादायी आहे. जिल्ह्यातील परिसर हिरवाईने नटणार आहे. फाऊंडेशनने उभी केलेली वृक्ष क्रांती चळवळ उज्वल भविष्याची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पालवे यांनी जय हिंदच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धनाच्या उपक्रमाची माहिती देऊन या अभियानात सहभागी होण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.
सदाशिव घोरपडे म्हणाले की, पर्यावरणाचे संवर्धन वृक्षरोपणाने होणार आहे. अधिक झाडांची लागवड झाल्यास पावसाचे प्रमाण देखील वाढणार असून, निसर्गाचा ढासाळलेला समतोल सुधारणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वड, पिंपळ, आंबा, चिंच, जांभूळ आदी देशी झाडांची लागवड करण्यात आली.