बिकट परिस्थितीवर मात करुन सीए झाल्याबद्दल कौतुक
यश साध्य करण्यासाठी बिकट परिस्थिती आडवी येत नाही -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातून पुढे येऊन व बिकट परिस्थितीवर मात करुन सीए झाल्याबद्दल तन्मय बंडू पुंड याचा शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात सन्मान करण्यात आला. श्री विशाल गणपती मंदिर देवस्थानचे विश्वस्त तथा शहर बँकेचे संचालक प्रा. माणिक विधाते यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, खजिनदार पांडुरंग नन्नवरे, सहखजिनदार रंगनाथ फुलसौंदर, मयूर भापकर, उद्योजक शशिकांत घिगे, बबनराव गोरे, सब रजिस्टार दिलीप गायकवाड, भाऊसाहेब पुंड, धीरज आगरकर आदी उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शिक्षणातून यशस्वी जीवनाची पायाभरणी होते. युवकांनी ध्येय समोर ठेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. यश साध्य करण्यासाठी बिकट परिस्थिती आडवी येत नाही, त्यासाठी ध्येयशक्ती अंगीकारावी लागते. अनेक दिग्गज व्यक्तीमत्व यांनी ध्येयशक्तीनेच यश गाठले आहे. नेप्ती, निमगाव फाटा या ग्रामीण भागातून आलेल्या पुंड याने मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पंडितराव खरपुडे यांनी पुंड यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना तन्मय पुंड याने सर्व ज्येष्ठांचे असलेल्या आशिर्वादाने व श्री विशाल गणपतीच्या कृपेने यश साध्य करता आले. देवस्थानच्या वतीने करण्यात आलेला सत्कार आणखी पुढे जाण्यास बळ देणारा असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
