कामांना मिळाली गती
रेशन कार्डचे रेंगाळलेले कामे सुरळीत होण्यासाठी संख्याबळ वाढविण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भात कामांना गती मिळाली असून, या विभागातील रेंगाळलेली कामे सुरळीत व नियमीत होण्यासाठी त्यांना अधिक कर्मचाऱ्यांचे संख्याबळ वाढवून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाईचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहे.

सहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून दोन ते तीन महिन्यापूर्वी रुजू झालेल्या सपना मनोहर भोवते यांनी कामाचे उत्तमप्रकारे नियोजन करुन रेशन कार्ड संदर्भातील प्रलंबीत कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भातील कामांना गती मिळाली आहे. या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
परंतु त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम करण्याची तयारी असताना देखील कामे लवकर करण्यास मर्यादा येत आहेत. त्यांना अधिक संख्याबळ वाढवून दिल्यास सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भातील प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.