• Wed. Oct 15th, 2025

अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टीमचा गौरव

ByMirror

Jul 1, 2024

पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान

11 महिन्याच्या बालकाची सुटका करुन अपहरणकर्त्यांना अटक केल्याच्या कार्याचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- 11 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करुन, त्यांच्या तावडीतून बालकाची मोठ्या शिताफीने सुटका करणारे अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर व त्यांच्या टीमचा ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला.


कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे व ज्ञानदीप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. पंकज लोखंडे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक लोणकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्‍वर वाघ, तेजस जंबे, विपुल पाटील, महादेव माने, मनोज पाटील, अतुल सोनमाळी, रोहित दिवे, बाळा भाकरे, प्रफुल्ल लोखंडे, नितीन साठे, जावेद सय्यद आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वार समोरील परिसरात लिंबाच्या झाडाखाली अमृता खडसे या महिलेच्या 11 महिन्याच्या बाळाला अनोळखी महिलेने जेवण करिता वरण-भात घेऊन येते अशी बतावणी करून बाळास पळवून नेले. बालकाच्या आईने लोहमार्ग पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर करीत असताना खबरी मार्फत माहिती घेऊन मोठ्या मोठ्या शिताफीने आरोपी महिला व दोन पुरुषांना अटक केली व त्यांच्याकडून बालकाला हस्तगत केले. तपासाची चक्रे अत्यंत जलद गतीने फिरवून 11 महिन्याचा स्वानंद खडसे या बालकाला आपल्या आईच्या स्वाधीन केले. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.


कॉ. अनंत लोखंडे यांनी अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टिमने केलेल्या कारवाईचे विशेष कौतुक करुन, या कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा विश्‍वास निर्माण झाला असल्याचे स्पष्ट केले. प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, अहमदनगर लोहमार्ग पोलीसांनी केलेली कामगिरीचे कौतुक होणे अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी होत असताना, त्यावर लगाम लावण्यासाठी लोहमार्ग पोलीस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर या कर्तव्य दक्ष अधिकारीमुळे बालकाचे अपहरण करणारे पकडले गेले असून, या प्रकरणातून मानवी तस्करीचे रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *