• Thu. Oct 30th, 2025

एका सामान्य सैनिकाची देशसेवा ते निवृत्तीनंतरची जनसेवा

ByMirror

Jun 11, 2024

माजी सैनिक कारभू (भाऊ) भागूजी थोरात सर्वसामान्यांसाठी ठरले आधार

वाजिद शेख – पिंपरी जलसेन (ता. पारनेर) येथील माजी सैनिक कै. कारभू (भाऊ) भागुजी थोरात यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विविध क्षेत्रात योगदान देऊन आपल्या जनसेवेचा ठसा उमटवला.
कारभू (भाऊ) थोरात यांचा जन्म 1949 साली झाला. ते 20 व्या वर्षी देश सेवेसाठी सैन्य दलात भरती झाले. त्यांनी 1972 साली पाकिस्तान विरोधात झालेल्या युध्दात सहभाग घेतला. त्यांनी पाकिस्तानच्या सिमेच्या आत 7 किलोमीटर जाऊन शत्रू सैन्याबरोबर लढाई केली. देशाची सेवा केल्यानंतर 1984 साली ते निवृत्त झाले.


निवृत्त झाल्यानंतर ते निघोज येथे स्थायिक झाले. निघोज गावात इलेक्ट्रिशियनचे काम करणारे कोणीच नव्हते, पाणी पंप दुरुस्त करण्यासाठी निघोज, पिंपरी जलसेन, अळकुटी या गटाच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अहमदनगर येथे जावे लागत असे. या सर्व बाबीचा विचार करून त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांसाठी इलेक्ट्रिशियनचा काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण निघोज, अळकुटी गटाच्या परिसरातील ग्रामस्थांना ही जवळच सेवा उपलब्ध झाली व त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागला. इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करीत असताना त्यांनी परिसरातील अनेक तरूणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे करिअर घडविले.


माजी सैनिक निवृत्त झाल्यानंतर त्यांचे जीवन निराशमय बनते. निवृत्त पेन्शनही कमी प्रमाणात असते, निवृत्त झाल्यानंतर काय करायचे? हा प्रश्‍न पडतो. ही बाब लक्षात घेऊन माजी सैनिकांना जिल्हा कल्याण बोर्डाकडून 5 एकर क्षेत्र जमीन शेती व्यवसाय करण्यासाठी मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले. शेती व्यवसायातून निवृत्त सैनिकांच्या कुटुंबाचा प्रश्‍न मार्गी लागला.


एवढ्यावरच न थांबता त्यांनी सेवानिवृत्त सैनिकांचे सामाजिक तसेच आर्थिक जीवन मान उंचावण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. याबाबीचा विचार करून त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. तर निवृत्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील प्रश्‍न सोडविण्यासाठी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. एकी हेच बळ! हा बळकट विचार कृतीमध्ये आणण्यासाठी कारभू (भाऊ) थोरात यांनी आपल्या माजी सैनिक सहकारीसोबत प्रत्येक वाड्या, वस्ती येथील सैनिकांना भेटून त्यांना एकत्रित केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशातील दुसरी सैनिक बँक 2 ऑक्टोबर 1995 रोजी पारनेर येथे स्थापन केली. त्याचे उद्घाटक म्हणून सैनिकांचे तिन्ही दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल व्ही.एम. पाटील उपस्थित होते.


ग्रामस्थ व आजी-माजी सैनिकांच्या पाठपुराव्याने सैनिक बँकेच्या भव्य इमारतीसाठी भारत सरकारकडून पारनेर येथे 0.15 आर जागा मिळवून दिली.
स्पर्धेच्या युगात सैनिक बँक मागे राहू नये, म्हणून पारनेर बरोबरच 16 ऑगस्ट 1998 रोजी श्रीगोंदा, 19 जुलै 2002 रोजी जामखेड, आणि 11 ऑक्टोबर 2002 रोजी कर्जत शाखा आणि हेड ऑफिस सह चार शाखा कार्यान्वीत करुन त्या शाखेचे संगणीकरण करण्यात आले. सैनिक बँकेचे कामकाज पहात असताना आपल्या सैनिक बँकेचा फक्त पारनेर अथवा जिल्ह्याला फायदा झाला पाहिजे असा संकोचित विचार न ठेवता पुणे, नाशिक, बीड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे व सोलापूर अशा एकूण सात जिल्ह्यांना त्याचा फायदा मिळावा हा विचार करून सात जिल्हे कार्यक्षेत्र मिळवून दिले आहे.


आजी-माजी सैनिक व समाजातील युवकांनी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरु केले आहे. सर्वसामान्य वर्ग, पेन्शन धारक, नोकरदार आपल्या ठेवी ठेऊन बँकेचा फायदा घेत आहे. बँकेत आज पर्यंत 44 कर्मचारी काम करत असून, सन 2014 मध्ये निघोज गावात बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शिबिर आयोजित करून 101 लोकांचे मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्याचे काम केले आहे.


एका सामान्य सैनिकाने आपल्या जीवनामध्ये स्वावलंबी जीवन जगणे पसंत केले होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. सामाजिक कार्यामध्ये त्यांना कुटुंबातून त्यांची धर्मपत्नी कै. रखमाबाई यांची खरी साथ मिळाली होती. संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे त्यांनी पार पाडली व पतीला कायमच सामाजिक कार्यामध्ये आधार देण्याचे काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *