• Thu. Oct 30th, 2025

वारंवार पाण्याची पाईपलाइन तोडणाऱ्या ठेकेदाराचे काम रामवाडीतील महिलांनी पाडले बंद

ByMirror

May 17, 2024

रामवाडीत पुन्हा पाणीबाणी; रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा निष्काळजीपणा

महापालिकेचा कारभार कस? तर ठेकेदार म्हणतील तस….. -विकास उडानशिवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा तुटल्याने पाण्याची गंभीर परिस्थिती ओढवलेल्या रामवाडीतील महिलांनी कराचीवाला नगर येथे सुरु असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले. पहिले पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन दुरुस्त करा, नंतर रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली.


कराचीवाला नगर येथून रामवाडी भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन गेली आहे. कराचीवाला नगर येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. दोन महिन्यापूर्वी देखील या रस्त्याच्या कामामुळे रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पिण्याचे पाईपलाइन तुटली होती. यामुळे रामवाडी भागात पिण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आयुक्तांची भेट घेऊन काही दिवसांनी ती पाईपलाइन दुरुस्त करण्यात आली. मात्र पुन्हा दहा-ते बारा दिवसापूर्वी कराचीवाला नगरमध्ये पोकलॅण्ड, जेसीबीद्वारे काम सुरु असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तुटली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संबंधित ठेकेदार व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना कळवून देखील तुटलेली पाईपलाइन दुरुस्त केली जात नसल्याने नागरिकांनी कराचीवाला नगरचे रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी विकास उडानशिवे, अनिता मिसाळ, नंदा जाधव, कल्पना मंडलिक, रविना उल्हारे, बिस्मिल्लाह शेख, अनिता पवार, निता उडाणशिवे, माधवी अडागळे, वैशाली साबळे आदींसह महिला उपस्थित होत्या. तातडीने पिण्याची पाण्याची पाईपलाइन दुरुस्त करुन नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी रामवाडी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.



महापालिकेचा कारभार कस? तर ठेकेदार म्हणतील तस….. आहे. विकास कामासाठी रामवाडीतील नागरिकांचा विरोध नसून, पिण्याच्या पाण्याची गैरसोय करुन निवांतपणे काम सुरु आहे. उन्हाळ्यात रामवाडीतील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर टँकर घरापर्यंत येत नसल्याने मोठ्या अंतरावरुन डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. मनपा प्रशासनाने ठेकेदारावर अंकुश ठेऊन चांगल्या पध्दतीने काम करुन घेणे अपेक्षित असताना ठेकेदार मनमानीपणे काम करत आहे. -विकास उडानशिवे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *