तसेच घाटशिरस येथे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मारहाण करणार्यावर कारवाईची मागणी
भारतीय प्रहार सैनिक संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर(प्रतिनिधी)- माजी सैनिकाच्या विवाहित मुलीला पतीसह सासरच्या लोकांनी छळ करुन फाशी दिली असल्याचा आरोप करुन तिसगाव (ता. पाथर्डी) येथील सासरच्या लोकांना त्वरीत अटक करुन कठोर कारवाई व्हावी व घाटशिरस (ता. पाथर्डी) येथे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मारहाण करुन त्रास दिला जात असताना संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी भारतीय प्रहार सैनिक संघाच्या वतीने गुरुवारी (दि.28 एप्रिल) जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, राहुल पाटोळे, पोपट कापसे, आदिनाथ केळकर, ज्ञानदेव देवखिळे, बुढन शेख, भाऊसाहेब जाधव, एकनाथ पवार, दिपक गायकवाड, बापूराव लाटे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, दिनेश बेल्हेकर, राजेंद्र केळकर आदी उपस्थित होते.
आदिनाथ केळकर हे माजी सैनिक असून, त्यांची 22 वर्षीय विवाहित मुलगी तेजश्री धीरज रांधवणे हिला (रा. तिसगाव ता. पाथर्डी) सासरच्या लोकांनी पैश्यासाठी छळ करुन गळफास देऊन जीवे मारले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला पती व सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र यामधील आरोपी फरार आहेत. सासरच्या लोकांना लवकरात लवकर अटक करावे. दोषी पती, सासू-सासरे आणि दीर यांच्यावर योग्य कारवाई करून माजी सैनिकांच्या पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी भारतीय प्रहार सैनिक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
अमृत जवान सन्मान योजनेसाठी पोलीस अधीक्षकांनी उत्कृष्ट कार्य करुन आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवलेले आहे. सीमेवर कर्तव्य बजावलेल्या माजी सैनिकाच्या मुलीवर हुंडाबळीची दुर्देवी घटना ओढवली आहे. या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांनी देखील दु:ख व्यक्त केला आहे. असे कृत्य पुन्हा घडू नये, यासाठी आरोपींना तात्काळ अटक करुन जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी. तसेच घाटशिरस (ता. पाथर्डी) येथील माजी सैनिकाची विधवा पत्नी मंदा विठ्ठल पडोळे यांच्यासह तिच्या मुलाला मारहाण करणे, धमकावणे, जमीन कसू न देण्याचा अत्याचार सुरु आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.