• Tue. Jul 22nd, 2025

महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान

ByMirror

Mar 8, 2024

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषार्थ गाजवत आहे -विजय भालसिंग

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीसांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला.


या सत्कार सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांचा राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर पुस्तक व मेडल देवून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महिला पोलीस पल्लवी रोहोकले, सोनाली खामकर, सोनाली खरमाळे, जयश्री सुद्रीक, स्वाती तोरडमल, श्‍वेता परमसागर, पूजा दिक्कत, वर्षा पंडित यांचा सत्कार झाला. यावेळी संजय सावंत, सुधीर पवार, पोलीस कॉन्स्टेबल संदिप पितळे उपस्थित होते.


पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे म्हणाल्या की, आजची महिला अबला नसून, सबला झाली आहे. तिला कायद्याचे संरक्षण मिळाले असून, आज ती समाजात सुरक्षितपणे वावरत आहे. सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कर्तुत्वाने पुढे जात आहे. महिला पोलीसांची जबाबदारी पेलविताना स्त्रीच्या संरक्षणाची देखील काळजी घेवून कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


विजय भालसिंग म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषार्थ गाजवत आहे. महिलांची बरोबरी कोणी करू शकत नाही. महापुरुषांना घडविणाऱ्या सर्व महिलाच होत्या. आजच्या महिलांचे सक्षम रुप समाजात पहावयास मिळत आहे. महिला या वात्सल्याचे प्रतिक तर वेळप्रसंगी दुर्गाचे अवतार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दिनानिमित्त झालेल्या सत्काराबद्दल महिला पोलिसांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *