महिलांनी बंधने लादून न घेता, भरारी घ्यावी -उषाताई गुंजाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेत महिला दिनानिमित्त स्वत:चे कर्तृत्व सिध्द केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. तर आर्थिक सक्षम होवून इतर महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देणाऱ्या व महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या महिलांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्थेच्या चेअरपर्सन उषाताई गुंजाळ, संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, सल्लागार समिती सदस्या कमल पवार, उमा गौरी वुमन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दिपाली पानसरे, प्रजापती पाईकराव, सामाजिक कार्यकर्त्या उज्वलाताई मंदिलकर, पूजा देशमुख, प्रशिक्षिका नाजिया शेख, अश्विनी गवळी, तबस्सुम सय्यद, वर्षा तांदळे आदींसह महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, महिलांना समाजात मान-सन्मान मिळवून देण्यासह त्यांचा सक्षम करण्याचे काम जनशिक्षण संस्था करत आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून समाजात उभे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उषाताई गुंजाळ म्हणाल्या की, महिलांना आपले हक्क मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. महिलांनी बंधने लादून न घेता, आपली भरारी घ्यावी. अनिष्ठ रुढी, परंपराचे बंधन झुगारुन विकासात्मक दिशेने जाण्याची गरज आहे. अंधश्रध्देला थारा न देता, अवती-भोवती घडणाऱ्या चूकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दिपाली पानसरे यांनी महिलांनी स्वत:साठी वेळ द्यावा. कौटुंबिक जीवनात वाहून घेताना स्वत:मधील कला-कौशल्यांना देखील प्रोत्साहन देण्याचे काम करावे. प्रत्येक महिलांमध्ये विविध कलाकौशल्य असतात. ते विकसीत करुन आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल करण्याचे स्पष्ट करुन आहार व व्यायामाने आरोग्य जपण्याचे सांगितले. प्रजापती पाईकराव म्हणाल्या की, महिलांनी दिलखुलास जगून इतर महिलांना जगायला शिकवावे. चार भिंतीच्या बंधनात अडकून न पडता, स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे. महिला व युवती आत्मनिर्भर झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कमल पवार म्हणाल्या की, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात जीवनाचा खरा आनंद आहे. यामुळे स्वतःची एक ओळख निर्माण होते. यशस्वी महिलांनी स्वतःचे कौशल्य विकसित करुन यश मिळवले. कौशल्याचा व्यवसायात रूपांतर केल्यास यश देखील मिळते. महिलांना सहानुभूती नको तर समानुभूती हवी असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहिणी ते प्रशिक्षिका व उद्योजिका ठरलेल्या नाजिया शेख, उज्वला मंदिलकर, डॉ. दिपाली पानसरे व उषाताई गुंजाळ यांचा विशेष गौरव करण्यात आला. तर विविध व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखापाल अनिल तांदळे, उषा देठे, विजय बर्वे व जन शिक्षण संस्थेतील प्रशिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
