• Wed. Jan 28th, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सशक्तिकरणाचा संदेश

ByMirror

Mar 8, 2024

कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायाधार संस्थेचा उपक्रम

प्रत्येक महिलेला सक्षम समाज घडविण्यासाठी जिजाऊ व्हावे लागणार -भाग्यश्री पाटील (न्यायाधीश)

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईलच्या पंखांनी दुबळी पिढी घडत असताना, प्रत्येक महिलेला सक्षम समाज घडविण्यासाठी जिजाऊ व्हावे लागणार आहे. मोबाईलच्या सानिध्यात मुले वाढत असताना त्यांच्यावर चुकीचे संस्कार घडत आहे. लिंगभेदावर आधारलेली समाज व्यवस्था बदलण्यासाठी स्त्रीला पुढाकार घेवून कुटुंबातून महिला-पुरुष समानतेचे पाऊल टाकावे लागणार असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले.


कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायाधार संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला सशक्तिकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायाधीश भाग्यश्री पाटील बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्ष ॲड. निर्मला चौधरी, कार्मेल कॉन्व्हेंट सोसायटीचे अध्यक्षा ॲड. सिस्टर पवित्रा, प्राचार्या सिस्टर लिटिल रोज आदींसह महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, समाजातील मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. मोहमायाच्या जाळात अडकून महिला-मुली, लहान मुले मानवी तस्करीचे बळी पडतात. समाज सजग झाल्यास हे प्रश्‍न सुटणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची माहिती दिली.


कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल मैदानात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी बॅण्ड पथक व लेझिम पथकाच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भरतनाट्यामच्या स्वागत गीतने सर्वांचे मने जिंकली. पाहुण्यांच्या हस्ते देशातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमेस अभिवादन करुन महिला सशक्तिकरणाचा संदेश देण्यात आला. स्वागत ॲड. सिस्टर पवित्रा यांनी केले.


ॲड. निर्मला चौधरी म्हणाल्या की, स्त्री ही करुणा व प्रेमाची प्रतीक आहे. तिने कर्तव्यात व आपल्या कामात श्रेष्ठत्व मिळवले आहे. महिलांना सक्षम होण्यासाठी त्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे. महिलांना समाजात दुय्यम स्थान मिळत आहे. स्त्री-पुरुष समानता कायद्यात असून चालणार नाही, ती समाजात येण्याची गरज आहे. महिलांमध्ये वेगवेगळे गुण असून, ते ओळखून महिलांनी स्वकर्तुत्वाने आर्थिक सक्षम होण्याचा त्यांनी सल्ला दिला.


ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे म्हणाल्या की, स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांची परिस्थिती दयनीय होती. समाज सुधारक व महापुरुषांनी महिलांच्या हक्कावर कार्य केले. राज्यघटनेने महिलांना समानतेचा अधिकार मिळाला, मात्र इतर देशात महिलांना अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. महात्मा फुले यांचा महिला सक्षमीकरणाचा वारसा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी सक्षमपणे पुढे चालवला. ध्रुवताऱ्यासारखे महिलांचे अढळ स्थान समाजात आहे. स्त्रियांना कायद्याचे संरक्षण मिळाले असून, त्यांनी ते ढाल म्हणून वापरावे शस्त्र म्हणून नव्हे, असे त्यांनी सांगितले. तर पोस्को कायद्याविषयी त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी ढोले यांनी केले. आभार सुवासिनी देसाई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. दीक्षा बनसोडे, ॲड. शुभांगी एस. चौधरी, महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक शकुंतला लोखंडे, अर्चना जावळे, सामाजिक कार्यकर्त्या गौतमी भिंगारदिवे, शबाना शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *