पारनेर सैनिक बँक कार्यालयासमोर गोस्वामी यांचे सभासदांसह उपोषण
आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचा पैसा वापरल्या प्रकरणी सैनिक बँकेच्या आधिकारी व निवडून आलेले पॅनल प्रमुखावर गुन्हा दाखल करुन वापरलेल्या रक्कमेचे व्याज वसूल करण्याच्या मागणीसाठी पारनेर सैनिक बँक कार्यालयासमोर विनायक गोस्वामी यांनी शुक्रवार (दि.1 मार्च) पासून सभासदांसह उपोषण सुरु केले आहे.
यावेळी अशोक गंधाक्ते, मेजर सखाराम पातारे, देवदत्त साळवे, चंद्रकांत पाचारणे, वैभव पाचारने, दिपक गायकवाड,मेजर मारुती पोटघन, कॅप्टन विठ्ठल वराळ, निलेश तनपुरे, संतोष राक्षे, विक्रमसिंह कळमकर आदी उपस्थित होते.
बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पॅनल प्रमुखाने बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्याशी संगनमत करुन पारनेर शाखेतून कोणताही अधिकार नसताना 45 लाख रुपये उचलून रकमेचा अपहार केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे.
अनेक वर्षे बँकेचा पैसा वापरून बँकेचे आर्थिक नुकसान झालं आहे. हा बँकेच्या खातेदारांचा, ठेवीदारांचा विश्वासघात आहे. त्या रक्कमेचे व्याज संबंधितांकडून वसूल करावा, कलम 83, 88 व फौजदारी गुन्हा दाखल करावा, कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरणातील आरोपीला नवीन संचालक मंडळाने बँकेतून बडतर्फ करावे, कर्जत येथील लेखा परीक्षण अहवालानुसार तत्कालीन संचालक मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या टोळीने बँकेतील 45 लाख रुपये निवडणुकीसाठी वापरले. आमच्यामुळे त्या पैश्याची मुद्दल व व्याज 25 लाख वसूली होणार आहे. नवीन संचालकांनी खोट्याला खोटे व खऱ्याला खरे म्हणायची भूमिका घेतली पाहिजे. गुन्हेगारांना पाठशी घातले तर नवीन संचालकावर भविष्यात सदर रकमेची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे सदर पैसे वापरणाऱ्या टोळीवर कारवाई करून बँकेत पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांना अपेक्षित असा पारदर्शक कारभाराला सुरवात करावी. -विनायक गोस्वामी