एकता फाउंडेशनच्या वतीने भांडकोळी यांचा सत्कार
मेडिकल स्टोअरमध्ये पार्टटाईम नोकरी करुन शिक्षण घेत मिळवले यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्य दलात अग्नीवीर (जनरल ड्युटी) म्हणून नियुक्ती झालेल्या प्रशांत छबुराव भांडकोळी या युवकाचा एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल फलके यांनी भांडकोळी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी केमिस्ट सुनील सोनवणे, शिरीष कुमार फलके, संचित बुलाखे, डॉ. रवींद्र सोनवणे, राजू फलके आदी उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून शहरात आलेल्या प्रशांत भांडकोळी या युवकाने शहरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये पार्टटाईम नोकरी करुन इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण केले. घरात एक बहिण व आई-वडिल असलेल्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने भांडकोळी यांनी नोकरी करुन शिक्षण पूर्ण केले. तर जीवनात काही तरी करण्याची जिद्द असल्याने व कुटुंबीयांना आधार देण्याच्या दृष्टीकोनाने त्यांनी भारतीय सैन्य दलात अग्नीवीर म्हणून भरती होण्याचा निर्णय घेतला.
नोकरी सांभाळून त्याने अग्नीवीर म्हणून भरती होण्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली. त्याची नुकतीच भारतीय सैन्य दलात अग्नीवीर (जनरल ड्युटी) साठी भरती झाली असून, त्याने मिळवलेल्या यशाबद्दल एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
अतुल फलके म्हणाले की, जिद्दीने पेटलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या या युवकाचे यश छोटे असले तरी, त्यामागचा संघर्ष प्रेरणादायी आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्याने शिक्षण घेतले व ध्येय गाठले आहे. युवकांनी ध्येय ठेऊन वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.