महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने खादी ग्रामोद्योगाचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला समाजातील लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कुंभार सशक्तिकरण मिशन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी खादी ग्रामोद्योग प्रशिक्षक संजय कोगदे, राजेंद्र हासे, ट्रेनिंग इन्चार्ज लक्ष्मण बोरसरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक सोनवणे, जिल्हाध्यक्ष नितीन घोडके, विनायक राऊत, नाथा मामा, वाघचौरे, शिवाजी महाशिकारे, मोरे सरकार आदी उपस्थित होते.

या शिबिरात संजय कोगदे व हासे यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांची माहिती देऊन शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अशोक सोनवणे म्हणाले की, उद्योग-व्यवसायातून समाजाची प्रगती होणार आहे. पारंपाररिक व्यवसायाला आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड देवून तरुणांना पुढे जावे लागणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योगधंद्याकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष नितीन घोडके यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुंभार समाजाच्या तरुणांना मिळवून देऊन त्यांना प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष मेहेत्रे, समाधान गोरे, ज्ञानेश्वर उन्हाळे, पांडुरंग क्षीरसागर, उल्हास जोर्वेकर, संजय दळे, गणेश डेंगळे, आकाश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.