खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
पालकांना देखील सहभागी होण्याची संधी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटीच्या वतीने 28 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाडीया पार्क जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून, यामध्ये खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे प्रा.आर.पी. डागवाले, प्रा. सुनील जाधव, दिनेश भालेराव व रोटरी डिग्निटीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न देवचक्के, सचिव उज्वला राजे यांनी केले आहे.
ही स्पर्धा 6, 8, 10, 12 व 14 वर्ष वयोगटातील मुला-मुली मध्ये होणार आहे. तसेच 40, 45, 50 वर्षे आतील मैदानी स्पर्धा रंगणार आहे. सकाळी 9 वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असून, यामधील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे. तर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र मिळणार आहे. 8, 10, 12 वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. हे खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, ही स्पर्धा 10 व 12 फेब्रुवारी रोजी सांगली येथे होणार आहे.
14 वर्षे व 6 आतील मुले-मुली व मास्टर 40, 45 आणि 50 वर्षे आतील पालकांसाठी या स्पर्धा फक्त जिल्हास्तरीय राहणार आहे. सर्व खेळाडूंना 25 जानेवारी पर्यंत प्रवेशिका जमा करण्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेला येताना मुळ जन्म दाखला व आधार कार्ड घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे.