• Sun. Jul 20th, 2025

राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील महिला शिक्षिका व प्राध्यापिकांचे सावित्रीच्या लेकी पुरस्काराने गौरव

ByMirror

Jan 3, 2024

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिवस म्हणून साजरी

सावित्रीबाई फुलेंच्या वारसदारांना शिक्षणाची ज्योत पुढे घेऊन जावी लागणार -आ. संग्राम जगताप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य भावी पिढी समोर घेऊन जावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले महापुरुष व रणरागिनींनी समाजासह देशाला दिशा दिली. त्यांचे कार्य गुगलवर शोधावे लागते, ही या पिढीची मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या महापुरुषांचे कार्य, विचार व वारसा सर्वांनाच ज्ञात असणे आवश्‍यक असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.


शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.3 जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. हॉटेल राजयोग येथे झालेल्या कार्यक्रमात शहर व उपनगरात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना सावित्रीच्या लेकी पुरस्काराने आमदार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुमतीलाल कोठारी, अशोकभाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, भाग्योदयचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, ॲबट विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, वसंत नरवडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे आदींसह महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, कुटुंब सांभाळून महिला शिक्षिका समाजाला दिशा देऊन पिढी घडवत आहे. मनपाची निवडणूक लांबली अन्यथा ही जयंती मोठ्या प्रमाणात इव्हेंट म्हणून साजरी झाली असती. महापुरुषांच्या जयंती, उत्सव इव्हेंट म्हणून नव्हे तर त्यांचे विचाराचे पाईक होण्यासाठी साजरे होण्याची गरज आहे. आजची महिलांची झालेली प्रगती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे. त्यांच्या वारसदारांना शिक्षणाची ज्योत पुढे घेऊन जाण्याचे त्यांनी आवाहन केले. शिक्षण हा समाजाचा पाया आहे. भावी पिढी सुशिक्षित झाली तर समाज भरकटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कोरोना काळात गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळेत 663 स्मार्ट टीव्ही व पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता देऊन, दुर्बल घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. माणिक विधाते म्हणाले की,  राष्ट्रवादीच्या वतीने दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते. शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन महिला सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालवित आहे. या कार्यातून भावी पिढी घडविण्यासह समाजाला प्रगतीपथाकडे घेऊन जाणाऱ्या महिला शिक्षकांचा सन्मान केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


पुरस्कार्थी महिलांनी महिला शिक्षकांचा सातत्याने होणारा सन्मान कौतुकास्पद आहे. समाज घडविण्याचे काम करत असताना महिला शिक्षकांना पुरुषांचे देखील पाठबळ मिळत आहे. तर पुरस्कार रुपाने कौतुकाची मिळालेली थाप आणखी काम करण्यास प्रेरणा देणार आहे. गरजू घटकांसाठी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे आमदार जगताप यांचे कार्य अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केल्या.


प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिला शिक्षणाची चळवळ यशस्वी केली. त्यांच्या कार्यामुळे महिलांना सर्व क्षेत्रात मान-सन्मान मिळाला आहे. आजच्या महिला शिक्षकांना सुसंस्कारी भावी पिढी घडविण्याचे कार्य करण्यासह वंचित घटकांसाठी कार्य करणे हेच खरे सावित्रीबाईंना अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुरीता झगडे यांनी केले. आभार अभिजीत खोसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहू कराळे, गणेश बोरुडे यांनी परिश्रम घेतले.


सावित्रीच्या लेकी पुरस्काराने या महिला शिक्षक वा प्राध्यापिकांचा झाला सन्मान
कल्पना जाधव, सुरेखा डोईफोडे (श्रीमती मायादेवी ॲबट हायस्कूल, भिंगार), जयश्री चौधरी, शोभा खोमणे (प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, भिंगार), वैशाली शिंदे (छावणी परिषद स्कूल, भिंगार), अंजना पंडित, तब्बसुम शेख, सुषमा उजागरे (सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल), निलोफर शेख, गुलनाज सय्यद (स्नेहालय बालभवन, भिंगार) शोभा पालवे (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), लीना पाटोळे (नवीन मराठी शाळा विश्रामबाग), निर्मला जगताप (सविता रमेश फिरोदिया), डॉ. पवनजीत वड्डाडी, शुभांगी घुले, संगीता भांबळ (अहमदनगर कॉलेज), मृणाल ठुबे, आरती साबळे, जयश्री काळदाते, अर्चना म्हस्के (रेसिडेन्शियल हायस्कूल), कृष्णकुमारी बोईनवार, सुनंदा बोर्डे (रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल), बेबी शिंदे (भाग्योदय विद्यालय केडगाव), सुनिता कोरडे (रेणुका माता प्राथमिक विद्यालय केडगाव), राजश्री कुलकर्णी (सरस्वती बालक मंदिर केडगाव), सविता कांबळे (जगदंबा विद्यालय केडगाव), जयश्री मुळे, अनुराधा शास्त्री, कल्पना राजगुरू, शारदा होशिंग, लीना बंगाळ (समर्थ विद्यामंदिर सावेडी), ज्योती सिसोदिया, शकुंतला देसर्डा (बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशाला), सुनिता शेवाळे (महाराष्ट्र बालक मंदिर), ज्योती शिरसाठ (योग शिक्षिका), चंदा कार्ले (श्रीनिवास कनोरे प्रशाल), ॲड. विद्या सांगळे (न्यू लॉ कॉलेज), विद्या साळवे, वैशाली निघोजकर, (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट), हेमा कदम, सविता शेळके, प्रमिला तांबे, मंदाकिनी कराळे (न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज), नंदा कानेटकर, प्रियंका अहिरे (दादा चौधरी विद्यालय), अमृता धारणगावकर (पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय), उज्वला साठे (भाई सथ्था नाईट स्कूल), अरुणा धाडगे (हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा, बागडपट्टी), सत्यश्री चिल्का (मेहेर इंग्लिश स्कूल ), रत्ना वाघमारे, भावना वैकर (पेमराज सारडा महाविद्यालय), भक्ती पुराणिक (शारदा मंदिर सबजेल चौक), पुष्पा नवले, अनिता कोरडे (आनंद प्राथमिक विद्यालय, गुलमोहर रोड), शलाका रसाळ, योगिता आव्हाड, विद्या भांगरे (भिंगार हायस्कूल), स्वाती भालेराव, शिल्पा कमलकर (अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल), शुभांगी ठुबे, शितल जगताप (राधाबाई काळे महिला महाविद्यालय), सुजाता खामकर (सिताराम सारडा विद्यालय).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *