रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
प्रांताधिकारी यांनी पुन्हा मूळ मालकांचे नाव महार वतनाच्या जागेवर लावण्याचे दिले आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रेल्वे स्टेशन जवळील इंगळे वस्ती, गायके मळा येथील एक एकर महार वतनाची जागा हडप करण्याच्या उद्देशाने नालेगाव तलाठी यांना हाताशी धरुन 7-12 उताऱ्यावर नाव लावणाऱ्या त्या तिघांसह नालेगाव तलाठीवर फसवणुकीचा व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणात प्रांताधिकारी यांनी साळवे कुटुंबियांच्या बाजूने निकाल देत साळवे यांचे नाव पुन्हा त्या महार वतनाच्या जागेवर नाव लावण्याचे आदेश दिले असून, यामधील आरोपी मात्र मोकाट सोडण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशन जवळील इंगळे वस्ती, गायके मळा येथे महार वतन इनामी वर्ग 6 हरिभाऊ विठ्ठल साळवे व इतर, सदाशिव भाऊसाहेब साळवे, सुनील सदाशिव साळवे व इतर यांच्या हक्काची एक एकर जमीनीवर पोपट लोढा, सुशील ओस्तवाल व मनिष चोरडीया यांनी नालेगाव तलाठी ज्ञानदेव बेल्हेकर यांना हताशी धरुन साळवे यांचे 7-12 वरील नावे उडवून 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी स्वत:ची नावे लाऊन घेतले. तर 21562 असा चुकीचा फेर काढला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याची माहिती मिळताच साळवे कुटुंबीयांनी तहसीलदार नगर यांच्याकडे तक्रार केली होती. सदर विषय तहसीलदार यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे वर्ग केला. त्यावर संपूर्ण शहानिशा करून कागदपत्राची पडताळणी करून 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रांताधिकारी यांनी साळवे कुटुंबियांच्या बाजूने निकाल देत साळवे यांच्या नावे पुन्हा लावण्याचे आदेश दिले. मात्र फसवणुकीने स्वत:चे नाव लावणारे त्या तिघांसह नालेगाव तलाठी यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर संगनमताने मागासवर्गीय समाजाची महार वतनाची जमीन फसवणूक करून बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितांवर फसवणुकीचा व ॲट्रोसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास रिपाईच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.