छोट्याशा गावातील मुलीचे अमिताभ बच्चननी केले कौतुक; वडिलांचे अखेरचे स्वप्न केले पूर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिगावने (ता. शेवगाव) येथील युवती वैशाली कृष्णा काशीद हिने आपल्या सामान्य ज्ञानाच्या बळावर टीव्हीवरील प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात प्रवेश मिळवून 6 लाख 40 हजार रुपये जिंकले.
या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर बसून तिने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सलग 11 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. या खेळात अत्यंत कमी वयात उत्तमप्रकारे उत्तरे दिल्याबद्दल सुपरस्टार बच्चन यांनी वैशालीची पाठ थोपटली.

वैशाली काशीद ही दहिगावने या छोट्याशा गावातील मुलगी असून, ती शिक्षणासाठी सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. ती बीई इंजीनियरिंग असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सिझनमधील 64 व्या ॲपिसोडमध्ये दहा स्पर्धकांत झालेल्या प्रश्नावलीत सर्वाधिक गुण मिळाल्याने वैशालीला हॉट-सीटवर बसण्याचा मान मिळवला.
प्रश्नांचे विविध टप्पे पार करुन ती बाराव्या प्रश्नावर 12 लाख 50 हजार रुपयांसाठी खेळत होती. इथपर्यंतच्या प्रवासात तिचे सर्व लाईफलाइन संपल्याने या प्रश्नावर तिने 6 लाख 40 हजार रुपये घेणे पसंत करुन हा खेळ सोडला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याने त्या लेवलच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले व करत असलेल्या अभ्यासाचा या स्पर्धेसाठी वैशालीला उपयोग झाला. तिचे कौतुक पाहण्यासाठी आई विजया काशीद व भाऊ विशाल काशीद कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
हुशार असलेल्या आपली मुलगी वैशालीने कौन करोडपती कार्यक्रमात जावे, ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. यासाठी अनेक वर्षापासून ती या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन करुन यामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र कोरोना काळात त्यांचे वडिल कृष्णा काशीद यांचे निधन झाले. त्यांचे अपूर्ण राहिलेले हे स्वप्न आज पूर्ण झाल्याच्या आनंद होत आहे. या कार्यक्रमातील अनुभव जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. तर वडिलांच्या निधनानंतर मागील दोन वर्षापासून घरात दिवाळी साजरी झाली नाही. यावर्षी वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन दिवाळी साजरी केली जाणार असल्याची भावना वैशाली काशीद हिने व्यक्त केली. तर या खेळात मिळालेले यश वडिलांना समर्पित करत असल्याचे तिने म्हंटले आहे.
