महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मान
कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगर तालुका तालीम सेवा संघाचे कार्य -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील कुस्तीपटू महेश बबन शेळके याची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने धाराशिव (उस्मानाबाद) येथे होणाऱ्या 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागात 65 किलो वजनगटात निवड झाल्याबद्दल नगर तालुका तालीम सेवा संघ, नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघ व ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
गावात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उपाध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव बाळू भापकर, पै. पोपट शिंदे, पै. अनिल डोंगरे, संदीप निमसे, नामदेव फलके, सचिन जाधव, सुनिल जाधव, भरत बोडखे, पिंटू जाधव, बबन शेळके, ओम आतकर, मन्सूर शेख, अजय ठाणगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, निमगाव वाघा गावाला कुस्ती क्षेत्राचा मोठा वारसा असून, अनेक दिग्गज मल्ल या मातीतून घडले आहेत. कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगर तालुका तालीम सेवा संघाचे कार्य सुरु आहे. तसेच गावातील यात्रोत्सवात कुस्ती हगामा घेऊन कुस्तीपटूंना रोख बक्षीसांचा वर्षाव केला जातो. महेश शेळके याने गावाचे नाव उंचावले असून, त्याने मिळवलेले यश गावातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने केडगाव येथे झालेल्या जिल्हा निवड चाचणीत महेश बबन शेळके याने गादी विभागात 65 किलो वजनगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजय पटकाविला. शेळके हा निमगावा वाघा येथील पैलवान आहे. या यशाबद्दल उपस्थितांनी शेळके याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
