भाजप कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांची मागणी; अन्यथा सोमवार पासून उपोषणाचा इशारा
पालकमंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाला पत्र देऊन देखील कार्यवाहीस टाळाटाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे पिण्यासाठी व सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भाजप कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष वेधले.

तसेच पालकमंत्री यांनी कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे दुष्काळी गावांना पिण्यासाठी व सिंचनाकरिता पाणी देण्याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार (दि.30 ऑक्टोबर) पासून कार्यालया समोर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पारनेर तालुक्यातील भाळवणी, विरोली, कान्हूर पठार, गोरेगाव, जामगाव, वडगाव आमली, भांडगाव, किन्ही, करंदी, निमगाव घाणा आदी गावातील शेतकरी पिढ्यांनपिढ्या दुष्काळी परिस्थितीत जगत आहेत. शेतकऱ्यांची पाण्या अभावी हेळसांड होत असून, पठारी भागातील सुपीक जमीन केवळ सिंचन अभावी कोरडवाहू बनली आहे. शेतकऱ्यांच्या युवा पिढीला शहराकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कर्जापोटी आत्महत्या देखील केलेल्या असून, ही अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे. येथील पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे पिण्यासाठी व सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाल्यास या गावातील दुष्काळी परिस्थिती हटणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रश्नावर पालकमंत्री विखे यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी तातडीने जलसंपदा विभागाला कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. मात्र त्यावर अद्यापि कार्यवाही झालेली नाही. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने आनखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच नियोजन म्हणून पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे पिण्यासाठी व सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणतात की, अहमदनगर जिल्ह्यात पाणी जाऊ देणार नाही? असे वक्तव्य एका मोठ्या नेत्याने करणे अशोभनीय आहे. पाणी ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. पालकमंत्री पद भुषवताना हा जिल्हा चालतो, मात्र पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होते. या नेत्यांच्या दबावाला बळी पडून जलसंपदा विभाग कार्यवाही करत नाही. मार्च ते मे या तीन महिन्यासाठी पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून पाणी मिळाल्यास शेतकरी आणि त्यांचे पशुधन वाचणार आहे. -रघुनाथ आंबेडकर (पारेनर तालुकाध्यक्ष, भाजप कामगार आघाडी)