अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी पतसंस्थेच्या वतीने दहा वर्ष संचालक राहिलेले मारूती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अशोक चेंगेडे, व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत, डॉ. श्रीकांत गांधी, रतीलाल गुगळे, संजय सपकाळ, बिपिनचंद्र लुनिया, रवींद्र बाकलीवाल, व्यवस्थापक राजेंद्र मेहेर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अशोक चेंगेडे म्हणाले की, भिंगारच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत मारूती पवार यांचे योगदान लाभत आहे. त्यांची झालेली निवड भिंगारकरांच्या व संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. त्यांचे सहकार क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य राहिले असून, त्यांनी पतसंस्थेत दहा वर्ष संचालक तर पाच वर्षे व्हाईस चेअरमन पदाची धूरा सांभाळली. सर्वसामान्यांना जोडलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, राजकारणाबरोबरच त्यांचे सामाजिक योगदान व त्यांचा जनसंपर्क कौतुकास्पद आहे.
त्यांच्या सोशल मीडिया विभागाच्या कार्यातून मोठ्या संख्येने युवा वर्ग राष्ट्रवादीशी जोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मारुती पवार म्हणाले की, भिंगारकरांचे प्रेम व पाठीवरती थाप असल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. प्रत्येक कार्यात हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छाने भविष्यात आनखी चांगले कार्य करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
