• Fri. Mar 14th, 2025

ईपीएस 95 पेन्शनधारकांचा शुक्रवारी श्रीरामपूरला जिल्हाव्यापी मेळावा

ByMirror

Oct 24, 2023

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने पेन्शनधारकांना सहभागी होण्याचे आवाहन

12 डिसेंबर देशव्यापी आंदोलनाचे केले जाणार नियोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील बारा वर्षापासून आंदोलने, मोर्चे करुन देखील केंद्र सरकारला जाग येत नसल्याने 12 डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.27 ऑक्टोबर) जिल्हाव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पेन्शनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे व सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे.


दुपारी 1 वाजता श्रीरामपूर येथील मेन रोडवरील टिळक वाचनालय येथे मेळाव्याचे प्रारंभ होणार आहे. देशव्यापी आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून, जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने पेन्शनर्स सहभागी होण्यासाठी या मेळाव्यात नियोजन केले जाणार आहे.


ईपीएस 1995 पेन्शन धारकांना 2012 पासून महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना पेन्शन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. दहा ते बारा वर्षे झाले तरी अद्याप एक रुपया देखील पेन्शन वाढ झालेली नाही. महागाईच्या काळात पेन्शनधारकांना जीवन जगणे अवघड झाले आहे. सन 2012 साली तत्कालीन खासदार भगतसिंग कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने 2013 साली केंद्र सरकारला अहवाल सादर केला. तसेच 20 एप्रिल व 29 ऑगस्ट 2023 रोजी लोकसभा सेक्रेटरी पार्लमेंट हाऊस (नवी दिल्ली) येथे ॲडिशनल डायरेक्टर यांनी पेन्शन धारकांच्या मागण्यासंबंधी पेन्शन संघटना व ट्रेड युनियन संघटना यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे.


कोश्‍यारी समितीचा अहवाल त्यावेळी केंद्र सरकारने स्विकारला असता पेन्शनधारकांना किमान आजपर्यंत 8 ते 9 हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळाली असती. बारा वर्षापासून पेन्शन धारकांनी केंद्र सरकारच्या विरोधात सतत पेन्शन वाढीकरता आंदोलन केले. अद्याप पेन्शन वाढ झालेली नाही. ईपीएस 95 पेन्शनधारकांना किमान 9 हजार पेन्शन द्यावी व त्यावर महागाई भत्ता द्यावा या प्रमुख मागणीसाठी संघटना केंद्र सरकारकडे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बाबूराव दळवी, ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाढे, अंकुश पवार, चिटणीस भागीनाथ काळे, आबासाहेब सोनवणे, बाळासाहेब चव्हाण, खजिनदार अशोक पवार आदी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *