भालसिंग यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्यांचा सत्कार केला.
मुंबई येथील इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन, अमरदीप बालविकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच त्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रात भालसिंग यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करुन, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
