निवडणुका या फक्त चंगळवादांची दिवाळी -ॲड. कारभारी गवळी
शहरातील कोट्यावधी खड्डे हे मतदारांच्या सारासार विवेकाची दिवाळखोरी असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने अहमदनगर येथून राष्ट्रीय मतं संधारण आंदोलन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. शहरातील वर्षानुवर्षाचे रस्त्यातील खड्डे नगरच्या मतदारांनी राष्ट्रीय मतं संधारण न केल्यामुळेच झाले असून, शहरातील कोट्यावधी खड्डे हे मतदारांच्या सारासार विवेकाची दिवाळखोरी स्पष्ट करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
स्वातंत्र्योत्तर 75 वर्षे संपली, परंतु सर्वच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतं खरेदी केली जातात. त्याशिवाय जात आणि धर्माच्या नावावर मोठ्या प्रमाणात मतदान घडून आणले जाते. याचा परिणाम अनेक सत्तापेंढारी मागच्या दाराने सत्तेमध्ये येतात. पैसा, दारू, कोंबडी, जात-धर्म अशा अनेक कारणांसाठी केलेले मतदान हे फक्त पुढच्या 48 तासांसाठीच जिवंत असते. त्यानंतर मागच्या दाराने निवडून आलेले सत्ता पेंढारी मतदारांच्या मताची कवडी मात्र किंमत करत नाही. तर मतदारांना पुढची पाच वर्षे विचारत सुध्दा नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या 30 ते 40 वर्षात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणे हा एक नफा खोरीचा धंदा झाला आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्टया आज देखील वाढत आहेत. शिक्षणाच्या प्रचार प्रसार झाला, परंतु तरुणांना रोजगार आणि नोकरी मिळत नसल्यामुळे बेकारीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. आजही कोट्यावधी गरिबांना स्वतःच्या मालकीची घरे नाहीत. एकंदरीत निवडणुकीमध्ये उभा राहणारा माणूस हा आपले काही भले करेल याची खात्री मतदारांना नाही. मतदारांच्या दारिद्य्रामुळे आणि जातीव्यवस्थेमुळे त्यांना समाजात योग्य ती सामाजिक प्रतिष्ठा आजही मिळत नाही. त्याचा परिणाम निवडणुका या फक्त चंगळवादांची दिवाळी या नात्याने साजरी केली जात असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
निवडणूक संपताच निवडून आलेल्या व्यक्तीचे घर भरण्याचे काम सुरू होते आणि मतदारांच्या वाट्याला आलेले दारिद्य्र आणि कायमची निराशा टिकून राहते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्या प्रमाणात लोकांच्या वाटेला स्वातंत्र्याची फळे मिळू शकलेली नाहीत. भ्रष्टाचारी आणि अनागोंदीमुळे लोक त्रस्त आहेत. देशात दुबळ्या लोकांसाठी आंदोलन सुरू नाहीत त्यामुळे सामान्य माणसाला मोठी निराशा आलेली असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. राष्ट्रीय मतं संधारण आंदोलनासाठी कॉ. बाबा आरगडे, ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, ॲड. लक्ष्मण पोकळे, अशोक भोसले आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
