• Mon. Jul 21st, 2025

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नामध्ये कोणीही राजकारण आणू नये -नगरसेवक अनिल शिंदे

ByMirror

Oct 17, 2023

काटवन खंडोबा येथील महात्मा फुले वसाहती मधील अंतर्गत ड्रेनेजलाईनच्या कामाला प्रारंभ

उघड्या गटारीमुळे दुर्गंधी, डास व साथीच्या आजारांना बसणार आळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले वसाहतीमध्ये उघड्या गटारी व आऊटलेट नसल्याने आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. काही विघ्नसंतोषी लोकांना विकास कामे बघवत नसल्याने त्यामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नामध्ये कोणीही राजकारण आणू नये. दुर्लक्षित राहिलेल्या संजय नगर व या वसाहती मधील प्रश्‍नांकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते सोडविण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.


काटवन खंडोबा येथील महात्मा फुले वसाहतीमधील अंतर्गत ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते. यावेळी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर, महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, आशिष (मुन्ना) शिंदे, बशीर शेख, मुन्ना शेख, युवराज पाचरणे, दत्ता शेळके, बाबू वाकळे, लुकमान शेख, नियाजोद्दीन शेख, सक्षम नवगिरे, प्रदीप ससाणे, सोनू राठोड, आशा साळवे, हिना शेख, सविता राठोड, पद्मा पाटोळे, मीनाज शेख, आसमा शेख, लीलाबाई दळवी, निलोफर पठाण, कांचन पंडित, शितल म्हस्के, सविता भोसले, संजीवनी बोरुडे आदींसग वसाहती मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे नगरसेवक शिंदे म्हणाले की, गोरगरीब कष्टकरींचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्याचे काम सुरु आहे. या भागातील ड्रेनेजलाईन व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. अंतर्गत ड्रेनेज लाईन मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून देण्याचे काम सुरु आहे. लवकरच पाण्याचा प्रश्‍न देखील सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


कॉ. अनंत लोखंडे म्हणाले की, गोरगरीबांच्या प्रश्‍नांची जाणीव असलेला नगरसेवक म्हणून अनिल शिंदे यांचे कार्य सुरु आहे. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करुन संजयनगर, महात्मा फुले वसाहतीचे प्रश्‍न मार्गी लावले. उघड्या गटारीमुळे दुर्गंधी, डास व साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. नागरिकांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत नगरसेवक शिंदे यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडून निधी मिळवून या भागातील ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न निकाली काढला असल्याचे त्यांनी सांगितले.


दत्ता गाडळकर म्हणाले की, काटवन खंडोबा परिसरातील विकास कामे अनिल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गी लागली आहे. सर्वसामान्यांना नागरी सुविधा उपलब्ध करुन, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे या परिसराचा विकासात्मक कायापालट होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रलंबीत व जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल वसाहती मधील नागरिकांच्या वतीने नगरसेवक शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर शिंदे यांनी सुरु असलेल्या कामाची पहाणी करुन सर्व काम दर्जेदार व चांगल्या पध्दतीने होण्यासाठी ठेकेदाराला सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *