वडगाव शिदोरी येथील बेसुमार अवैध वाळू उपसा त्वरीत थांबविण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- घोड नदीपात्रातील गाळ मिश्रित वाळू उपसा करण्याची परवानगी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर घोड नदी पात्रातील परवानगी असलेल्या गटातून वाळू उपसा न करता, वडगाव शिदोरी (ता. श्रीगोंदा) येथे सुरु असलेला बेसुमार अवैध वाळू उपसा त्वरीत थांबवावा व या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे जिल्ह्यातील निमोणे व चिंचणी येथील घोड नदीपात्रातील गाळ मिश्रित वाळू उपसा व वाहतूक करण्यास पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात हा अवैध वाळू उपसा वडगाव शिदोरी (ता. श्रीगोंदा) गावातून होत आहे, याला ग्रामस्थांनी विरोध केला असला तरी, अर्थपूर्ण संबंधातून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
घोड नदी पात्र लिलावात उपसा करण्यासाठी जे गट दाखवण्यात आले आहे. ते चिंचणी गावालगत नागनाथ मंदिर परिसरात आहे. 1, 2, 47, 148 व 164 हे गट लिलावात नमूद करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणाहून वाळू उपसा न करता चिंचणी धरण फुगवटा क्षेत्रातून श्रीगोंदा हद्दीतून जोरात वाळू उपसा सुरू आहे. जवळपास 20 ते 25 बोटीच्या आधारे हा वाळू उपसा सुरू असून, आज अखेर 5 हजार ब्रास वाळू उपसा झालेला आहे. लिलावाची जागा एका ठिकाणी व उपसा दुसऱ्या ठिकाणाहून सुरु आहे. यामध्ये तीन किलोमीटरचे अंतर आहे. सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई व्हावी व अवैध वाळू उपसा पंधरा दिवसाच्या आत बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
