ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना डोंगरे यांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे कार्य केले -पै. सोमनाथ राऊत
अहमदनगर (प्रतिनिधी)- बुऱ्हाणनगर येथील श्रीराम कुस्ती संकुलच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या (जि. जळगाव) वतीने माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कुस्ती प्रशिक्षक पै. सोमनाथ राऊत यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी बाळासाहेब जाधव, देवीदास शेंडे, निलेश मदने, दुर्गेश भगत, पै. मनोहर कर्डिले, आनंद शिंदे आदींसह कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. सोमनाथ राऊत म्हणाले की, डोंगरे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी असून, कुस्ती खेळाला चालना देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. नगर तालुका तालीम सेवा संघ व विविध क्रीडा संघटनांच्या माध्यमातून त्यांचे उत्तमपणे कार्य सुरु असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा सर्व कुस्ती प्रेमी व खेळाडूंना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, कुस्ती खेळातून गावोगावी जनसंपर्क निर्माण झाला. या जनसंपर्कातून सामाजिक कार्य उभे राहिले. प्रत्येक युवा खेळाडूंना सामाजिक कार्यात जोडून गाव पातळीवर समाजकार्य व सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
