• Wed. Nov 5th, 2025

भाई सथ्था रात्र शाळेत प्रा. शिरीष मोडक यांचा सत्कार

ByMirror

Oct 14, 2023

प्रा. मोडक यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान दिशादर्शक -ॲड. अनंत फडणीस

अहमदनगर (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषद (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांना राज्यस्तरीय शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भाई सथ्था रात्र शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


भाई सथ्था रात्र शाळेत झालेल्या सत्कार सोहळ्यात स्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी मान्यवरांचे समवेत प्रा. मोडक यांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, शाळा समिती सदस्य प्रदीप मुथा, प्राचार्य सुनिल सुसरे उपस्थित होते.


प्रास्ताविकात चेअरमन डॉ. पारस कोठारी म्हणाले की, हिंद सेवा मंडळाच्या शिरपेचात प्रा. मोडक यांना मिळालेल्या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला गेला आहे. सामाजिक, शैक्षणिक व प्रत्येक क्षेत्रात असलेला त्यांचा अभ्यास व योगदानाने त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य सुनिल सुसरे यांनी केले.


ॲड. अनंत फडणीस म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांनी केलेला सत्कार पुढील कार्यासाठी ऊर्जा देत असतो. या सत्काराला वेगळे महत्त्व आहे. प्रा. मोडक यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. अजित बोरा म्हणाले की, प्रा. मोडक यांचे कार्य व योगदान सर्वांसाठी दिशादर्शक राहिले आहे. संस्थेला त्यांचा अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सत्काराला उत्तर देताना प्रा. शिरीष मोडक म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांनी केलेला ह सत्कार महत्त्वपूर्ण असून, हा पुरस्कार मिळण्यासाठी हिंद सेवा मंडळाचा मोलाचा वाटा आहे. संस्थेत सीनियर संचालक म्हणून कार्य करताना दोन वेळा अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तपणे योगदान देता आले. नाईट हायस्कूलशी वेगळी आत्मीयता असून, दिवसा कष्ट करून विद्यार्थी रात्री शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवत आहे. शिक्षक वर्ग देखील त्यांना तेवढ्याच आत्मियतेने शिकवत आहे. नाईट हायस्कूलच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहून त्यांच्या संघर्षाला पाठबळ दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी पालक अफसाना बागवान, अंबादास जावळे, असीम शेख आदींसह पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पवार यांनी केले. आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *