• Wed. Jul 23rd, 2025

नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी बनलाय धोकादायक

ByMirror

Oct 13, 2023

अक्षरश: चाळण झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्गातंर्गत असलेल्या नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्त्याच्या दुरावस्थेने नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे. गाडळकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना या प्रश्‍नी निवेदन दिले.


नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता पावसामुळे अक्षरश: चाळण बनला आहे. या रस्त्यावर शहरासह बाहेरील वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डयांमुळे रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. या खराब रस्त्यावरुन येण्या-जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तर शालेय विद्यार्थ्यांना देखील या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीच्या फुफाट्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या नवरात्र उत्सव व दिवाळी सणाच्या खरेदीसाठी महिला वर्ग आणि कुटुंबातील सदस्य मोठ्या प्रमाणात घरा बाहेर पडत असतात. नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्त्यावरुन जाताना जीव मुठीत धरुन नागरिकांना जावे लागत आहे. या रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता दुरुस्त करावा. -दत्ता गाडळकर (शहर सचिव, भाजप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *