16 आक्टोबर पासून होणाऱ्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आशांनी घेतली विखे यांची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन काम करण्याची सक्ती शासनाने आशा सेविकांवर लादली आहे. त्या विरोधात संपूर्ण राज्यात आशा सेविका 16 आक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आशांच्या शिष्टमंडळाने महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विखे यांनी त्यांचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
आयटकचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. सुरेश पानसरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर, राहाता व अकोले येथील आशांनी महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची लोणी (ता. राहता) येथे भेट घेतली. तर शासनाने आशांवर ऑनलाईन कामाची सक्ती करू, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय घेऊन ऑनलाईन कामाबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
याचबरोबर आशा सुपरवायझर (बी.एफ.) यांना समा योजना लागू करावी, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तो पर्यंत त्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेऊन त्याप्रमाणे वेतन श्रेणी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा प्रश्न देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.
यावेळी आशा सुपरवायझर कॉ. अंजली तरकसे, भवार मॅडम, कॉ. वर्षा मांडुळे, श्रीरामपुर आयटकच्या तालुका अध्यक्ष कॉ. कविता गिरे, निर्मला कहांडळ, कॉ. अश्विनी गोसावी, प्रमोदिनी धावणे, प्रतिभा वैदय, वैशाली नेमाडे, संगीता भालेराव या सुपरवायझर तसेच कॉ. जयश्री गुरव, कॉ. सुनिता धामणे, कॉ. शितल विखे, सोनाली शेजुळ, शशिकला गायकवाड, विमल भोसले, संगीता गायकवाड, राहाता तालुकाध्यक्षा कॉ. सविता धापटकर, अकोले तालुकाध्यक्षा कॉ. उषा अडागळे आदी आशा कर्मचारी उपस्थीत होत्या. या सर्व मागणीसाठी आयटकच्या माध्यमातून राज्य उपाध्यक्ष कॉ.ॲड. सुधीर टोकेकर मंत्री विखे पाटील यांच्याशी पाठपुरावा करत आहे.
