समाजातील सक्षम नेतृत्व असलेले डागवाले यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात योगदान -गणेश बनकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- माळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले यांची भाजप ओबीसी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल माळी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पटवर्धन चौकात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, जिल्हा सचिव विवेक फुलसौंदर, पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, उद्योजक आघाडी शहर उपाध्यक्ष मनोज फुलसौंदर, शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले आदींसह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश बनकर म्हणाले की, समाजातील सक्षम नेतृत्व असलेले डागवाले यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा भाजप ओबीसी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांची निवड ही समाजाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करण्याचे काम त्यांनी केले आहे. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी त्यांचे सातत्याने योगदान राहिले असून, माळी महासंघाच्या सेवाकार्यात देखील त्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी डागवाले यांची निवड झाल्याबद्दल पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना किशोर डागवाले यांनी ओबीसी समाजाला एकत्र घेऊन न्याय, हक्कासाठी कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट करुन पुन्हा मिळालेली संधी व सर्वांनी टाकलेल्या विश्वासामुळे काम करण्याची आनखी जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभार नितीन डागवाले यांनी मानले.
