जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे -सुनिल साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 वा स्थापना दिवस मंगळवारी (दि.3 ऑक्टोबर) हैदराबाद येथे साजरा होणार आहे. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.

मंगळवारी तेलंगणा राज्यातील हैदराबाद मध्ये नामपल्ली, रेल्वे स्टेशन जवळील मुकररामजाही रोडवरील मैदानात हा मेळावा होणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व प्रेरणेने 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ऐतिहासिक स्थापना झाली. त्यानुसार दरवर्षी रिपाईच्या वतीने 3 ऑक्टोबर रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला रिपब्लिकन पक्षाचा ऐतिहासिक वारसा रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या माध्यमातून चालविला जात आहे. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन संकल्पनेचा वारसा घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याची माहिती साळवे यांनी दिली.
नागालँड मध्ये रिपाईचे दोन आमदार निवडून आले. लक्षदीप पोंडीचेरी, केरळ ते जम्मू-काश्मीर पर्यंत देशातील सर्व राज्यात आणि आठ केंद्रशासित प्रदेशात रिपब्लिकन पक्ष वाढवण्यात येत आहे. या मेळाव्यात देशभरातील रिपाईचे पदाधिकारी व भीमसैनिक एकवटणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
