युवकांना उद्योग, व्यवसायात चालना देण्यासाठी मार्गदर्शन
कटारिया परिवारातील सर्वांचे कार्य अभिमानाने मान उंचावणारे -अशोक कटारिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन अहमदनगर शाखेचा मेळावा उत्साहात पार पडला. जिल्ह्यासह राज्यात विविध उद्योग, व्यवसायात असलेले कटारिया बांधव कुटुंबासह एकवटले होते. या मेळाव्यात युवकांना उद्योग, व्यवसायात चालना देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तर पर्युषण पर्वानिमित्त उपवास करणारे 40 परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

फाऊंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा अशोक बिल्डकॉनचे अशोक कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश कटारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए रवींद्र कटारिया, बांधकाम उद्योजक सचिन कटारिया, सीए अभय कटारिया, फाऊंडेशनचे राष्ट्रीय विधी सल्लागार सीए सिध्दार्थ कटारिया आदींसह कटारिया फाऊंडेशनचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अशोक कटारिया म्हणाले की, जैन समाजातील कटारिया परिवाराचे सदस्यांनी विविध उद्योग, व्यवसायात आपला ठसा उमटविला आहे. हा परिवार कटारिया फाउंडेशनच्या माध्यमातून जोडला गेला आहे. सर्व एकत्र आल्याने विचारांची देवाण-घेवाण होऊन व्यवसाय व उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. फाउंडेशनने सर्वांना एकत्र जोडून ठेवले आहे. सर्वांचे कार्य मनाला समाधान देणारे व अभिमानाने मान उंचावणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनेश कटारिया यांनी या उपक्रमातून नवउद्योजक व व्यावसायिकांना दिशा मिळणार आहे. या मेळाव्यातून स्नेह वृद्धिंगत होऊन मोठा परिवार एकमेकांशी जोडला गेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सीए रवींद्र कटारिया म्हणाले की, फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी दिशादर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. अशोक कटारिया यांचे विचार व कार्य युवकांना दिशादर्शक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात महामार्ग उभारुन त्यांनी देशाच्या विकासासाठी योगदान दिले असल्याचे सांगितले. तर अहमदनगर शाखेच्या कार्याचे कौतुक करुन विविध क्षेत्रात सुरु असलेल्या कटारिया फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमात कटारिया वेंचर्सच्या सर्व सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. शैक्षणिक विभागाचे राष्ट्रीय सल्लागार आनंद कटारिया यांनी आभार मानले.