पाककला स्पर्धेस माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
फास्टफुडच्या युगात मुलांच्या आहारातून तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सकस आहाराचे महत्त्व पालकांमध्ये रुजविण्यासाठी भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत तृणधान्यापासून बनविलेल्या खाद्य पदार्थांची पाककला स्पर्धा घेण्यात आली. माता पालकांनी तृणधान्यापासून बनविलेले विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या स्पर्धेतून शालेय मुलांच्या जेवणात तृणधान्याचा समावेश करण्याचा संदेश देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पाककलेचे परीक्षण माजी नगरसेविका शारदा ढवण यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, योगिता वाघमारे, अहिल्या सांगळे, संगिता नजन, सविता काजळकर, योगिता गोरे, रोहन ढवण आदींसह माता पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी नगरसेविका शारदा ढवण म्हणाल्या की, शहरालगत असलेली भिस्तबागची जिल्हा परिषद शाळा विविध शैक्षणिक उपक्रमातून नावरुपास आली आहे. मुलांच्या विकासासाठी सकस आहार आवश्यक बाब बनली आहे. धावपळीच्या युगात मुलांच्या आरोग्याबाबत पालकांनी जागृत राहण्याची गरज आहे. सशक्त पिढीसाठी पालक, शिक्षकांनी पुढाकार घेतल्यास सक्षम पिढी घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, मुलांचे आरोग्य चांगले राहिल्यास ते उत्तम पद्धतीने ज्ञानार्जन करु शकतात. मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार मिळणे गरजेचे आहे. मुलांना शाळेत डबा देताना त्यामध्ये पौष्टिक अन्नपदार्थाच्या समावेश असला पाहिजे. फास्टफुडच्या युगात मुलांच्या आहारातून तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तृणधान्याचा आहारात समावेश आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पाककला स्पर्धेत आकर्षक पध्दतीने सजावट करुन तृणधान्यापासून बनवलेले विविध खाद्य पदार्थ ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात सर्व पालकांनी विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. तर माता पालकांना सकस आहाराची माहिती देण्यात आली. शालेय उपक्रमात आई सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला होता. या स्पर्धेत सहभागी सर्व माता पालकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. तर पहिल्या तीन क्रमांकाच्या माता पालकांना बक्षीस देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
