कवी व साहित्यिकांना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद -आ. लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे झालेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांचा गौरव केला. शिक्षक दिनानिमित्त नुकतेच स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने काव्य संमेलन उत्साहात पार पडले.
या संमेलनात डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. शंकर चव्हाण, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे, स्वागताध्यक्ष माधवराव लामखडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे, कोतवाली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक अश्विनी मोरे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, उद्योजक बाळासाहेब शहाणे, वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे, मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, शर्मिला गोसावी, रज्जाक शेख आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, कवी, साहित्यिकांना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले आहे. पै. नाना डोंगरे निस्वार्थ भावनेने सामाजिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. सातत्याने धडपड करणारे व विविध उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काव्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माधवराव लामखडे यांनी डोंगरे यांचे तळमळीने सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
काव्य संमेलनात राज्यातील नवोदित व ज्येष्ठ कवींनी सहभाग नोंदविला होता. कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवून, कवींनी सामाजिक व्यथा मांडल्या. एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण यावेळी झाले. राज्याच्या विविध भागातून संमेलनात सहभागी झालेल्या कवींचा सन्मान करण्यात आला.
