रस्ता खुला करुन देण्याची गावातील दिव्यांग व्यक्तीची मागणी
त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ता बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी
अहमदनगर (प्रतिनिधी)- गाव नकाशाप्रमाणे पारंपरिक असणारा व मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणारा मौजे रूपेवाडी (शंकरवाडी) (ता. पाथर्डी) येथील रस्ता पुन्हा बंद करण्यात आल्याने सदर रस्ता खुला करुन देण्याची व मागणी गावातील दिव्यांग व्यक्ती पोपट केरु शेळके यांनी केली आहे. तर सदर रस्ता त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करण्यात आला असून, दिव्यांग असल्याने घरी व शेतात जाण्यासाठी निर्बंध आले आहे. हा रस्ता बंद करणाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम 2016 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन पाथर्डीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे यांना देण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, मुकुंद आंधळे, शिवाजी बडे, शेख, जरे, हुमायू आत्तार आदींसह प्रहार दिव्यांग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
पूर्वी बंद करण्यात आलेला हा रस्ता शेळके यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याचे मोजमाप करुन हा रस्ता 14 जानेवारी 2022 रोजी खुला करुन देण्यात आला होता. मात्र हा रस्ता अनाधिकृतपणे मोहिते कुटुंबीयांनी पुन्हा 24 जुलै 2023 रोजी बंद केला आहे. गावातील बंद असलेला दक्षिण-उत्तर रस्ता घोडेगाव मिरी मुख्य रस्त्याला जोडणारा आहे. उत्तरेकडील लोहारवाडी व चांदा या गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने उत्तरेकडील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पाऊस नसल्याने शेतीचे कामे खोळंबली आहे. पाऊस आल्यास शेतामध्ये जाण्यासाठी देखील अडचण येणार आहे. शारीरिक दृष्टया अपंग असल्याने घरी व शेतात जाण्यासाठी हेळसांड होत आहे. दीड महिन्यापासून वाहन गावात लावून मोठी कसरत करुन घरी जावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
रस्ता बंद करणारे मोहिते कुटुंबीयांकडून शिवीगाळ करुन मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करुन संबंधितांवर दिव्यांग अधिनियम 2016 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.