• Fri. Mar 14th, 2025

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर शहरात उभारणार सेवाभावी डेंटल क्लिनिक

ByMirror

Aug 31, 2023

पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या बैठकीत नगरकरांसाठी कायमस्वरुपी अल्पदरात डेंटल क्लिनिकची पायाभरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर क्लबचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईडमध्ये यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना सपत्निक सन्मान करण्यात आला.


लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डेंटल क्लिनिक उभारणीसह इतर सामाजिक उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत आदींसह सर्व लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या बैठकीत राहता येथे नव्याने लायन्स क्लबची स्थापना करणे, स्नेहालयात दरवर्षी साजरी होणाऱ्या वंचितांच्या दिवाळी मेळाव्याचे नियोजन करणे आदी सामाजिक प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली.


लायन्सच्या माध्यमातून तारकपूर येथे प्रकल्प प्रमुख डॉ. संजय असनानी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स डेंटल क्लिनिक चालविण्यात येणार आहे. डॉ. असनानी यांनी हा क्लिनिक ना नफा, ना तोटा या तत्त्वावर चालणार आहे. दातांच्या विकारावर अत्यंत खर्चिक असलेल्या रुट कॅनॉल, वेडेवाकडे दात सरळ करणे, कवळी बसवणे, स्माईल डिझायनिंग, इंप्लांट, पक्के दात बसविणे आदी सुविधा अल्पदरात उपल्ब्ध होणार असल्याने सर्वसामान्य वर्गाला या आरोग्य सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भंडारे यांनी लायन्स डेंटल क्लिनिकचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचे लवकरच लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती दिली.


पॅरीसच्या सायकल राईडमध्ये सहभाग नोंदवून पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस दरम्यानचा 1200 कि.मी. चा प्रवास 87 तासात पूर्ण करणारे जस्मितसिंह वधवा यांनी आपला थरारक अनुभव विशद केला. वधवा म्हणाले की, ही राईड अत्यंत अवघड व आव्हानात्मक होती. देशातील शंभर सायकलपटू मधून एक सायकलपटू या राईडसाठी सज्ज होत असतो. ऑलिम्पिक प्रमाणे महत्त्वाची समजली जाणारी ही राईड चार वर्षातून एकदा होते. शारीरिक क्षमेतेचा कस लावणाऱ्या व अत्यंत अवघड ट्रॅक असलेली ही राईड 90 तासात पूर्ण करायची असते. अनेक सायकलपटू निम्म्यातून ही राईड सोडतात. डोंगर, टेकड्यांचा ट्रॅक असलेली राईड दिवस-रात्र एक करुन शेवटच्या क्षणापर्यंत वेळेत पूर्ण केल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. तर पॅरीसमध्ये सायकल चालवणे मोठेपणाचे लक्षण मानले जात असून, तेथे असलेले सायकल ट्रॅक व सायकलपटूंना मिळणारी मानाची गावणुक याबद्दल माहिती दिली. तर ऐनवेळी सायकलची चैन तुटणे सायकल दुरुस्तीमध्ये गेलेला वेळ, रात्री न झोपता वाया गेलेला वेळ भरुन काढण्याच्या थरारक अनुभवाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *