गुरुनानक देवजी (जी.एन.डी.) सेवा पंजाबी सिंधी ग्रुपचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील अमरधामला गुरुनानक देवजी (जी.एन.डी.) सेवा पंजाबी सिंधी ग्रुपच्या वतीने अंत्यविधीसाठी सातत्याने गरज भासणाऱ्या लोखंडी तिरडींची भेट देण्यात आली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते तिरडी अमरधामला सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी उद्योजक जनक आहुजा, महेश मध्यान, राकेश गुप्ता, संजय धुप्पड, संजय आहुजा, कैलास नवलानी आदी उपस्थित होते.

अंत्यविधीसाठी लाकडी बांबू व जनावरांच्या चारा असलेल्या कडब्यापासून तिरडी बनविण्यात येते. वेळप्रसंगी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यास लवकर कडबा मिळणे अवघड होते. तर कुटुंबीय, नातेवाईकांची धावपळ देखील होते. नागरिकांना तिरडी कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी गुरुनानक देवजी (जी.एन.डी.) सेवा पंजाबी सिंधी ग्रुपच्या वतीने अमरधाम मध्ये तिरडी भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे जनक आहुजा यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते यांनी कोरोना काळात शीख, पंजाबी, सिंधी समाजबांधवांनी लंगर सेवेच्या माध्यमातून दुर्बल घटकांची मोठी सेवा केली. विविध प्रकारे त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरु आहे. अमरधामला तिरडी उपलब्ध करुन देण्याचा राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.