केडगाव ग्रामस्थांच्या वतीने संदीप (दादा) कोतकर युवा मंचची मागणी
खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची परवड; काम सुरु न झाल्यास नगर-पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलनचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- दुरुस्तीसाठी खोदलेला व सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना अंबिका नगर बस स्टॉप ते शाहूनगर बस स्टॉप रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन केडगाव ग्रामस्थांच्या वतीने संदीप (दादा) कोतकर युवा मंचच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले.

प्रलंबीत रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असताना मनपासमोर निदर्शने करुन, सदर रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात मार्गी न लावल्यास नगर-पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष भूषण गुंड, राजेश साठे, योगेश पवार, विकास साठे, हरीश गिरी, तुषार पुरुषोत्तम, नरेश राणा, विजय विटकर, अक्षय अकोलकर, शुभम दरंदले, अमोल सातपुते, संकेत सातपुते, ओंकार गुंड आदींसह नागरिक उपस्थित होते.
अंबिका नगर बस स्टॉप ते शाहूनगर बस स्टॉप रस्ता दुरुस्ती बाबत सर्व प्रक्रिया यापूर्वी पूर्ण झालेली आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना मोठ्या अडचणीचे बनले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेला असून, काम अर्धवट सोडून देण्यात आलेले आहे. या रस्त्यावरुन शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. पावसामुळे हा रस्ता अधिक धोकादायक बनला असून, अनेक वाहनांचे लहान मोठे अपघात घडत आहे. रस्त्यावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. सदर रस्त्यावर चांगली बाजारपेठ असून, खराब रस्त्यामुळे व्यवसायावर ही मोठा परिणाम झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संदीप (दादा) कोतकर युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे.