स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्ती जागविणाऱ्या विविध कार्यक्रमांनी उत्साह संचारला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेत आलेल्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
प्रारंभी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते खान मतीन अब्दुल मजीद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समीउल्ला शेख यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेची झालेली प्रगती विषयी माहिती दिली. जाविद पठाण यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य दिन विषयी माहिती दिली. याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे सदस्य, पालक, शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतीन खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकांनी आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवून त्यांना वाईट गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबध निर्माण करावे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाकरीता प्रयत्न करण्याचे पालकांना आवाहन केले. तसेच समाजातील युवकांनी देशासाठी समर्पित भावनेने योगदान देण्याचे आवाहन केले.
उपस्थित पालक व परिसरातील नागरिकांनी स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास टाळ्यांचा कडकडाटात दाद दिली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालिका डॉ. आसमा काझी, सईद शेख, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक समीउल्ला शेख, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एजाज शेख, तबस्सुम शेख, अर्शिया हवालदार, मेहरुना शेख, निलोफर शेख, आयेशा शेख, तनाज शेख, बाळासाहेब चौधरी, सुरेखा ससे, इंगळे मॅडम, अंजुम इनामदार, नर्गिस खान, शब्बीर शेख, फरजाना सय्यद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना शेख व जाविद पठाण यांनी केले.
