ढोल ताशाच्या निनादात विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा शोभायात्रा
देशाला संस्कारक्षम पिढीची गरज -जवाहर मुथा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, मोहिनी नगर येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तर परिसरातून वंदे मातरम…, भारत माता की जय…. च्या घोषणा देत हातात ढोल ताशाच्या निनादात तिरंगा शोभायात्रा काढण्यात आली.

प्रारंभी बांधकाम व्यावसायिक तथा जितोचे चेअरमन जवाहर मुथा, राजेश भंडारी, गौतम मुनोत व सचिव अमित मुथा यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जितोचे व्हाईस चेअरमन गौतम मुनोत, सुमंगल मुनोत, अलोक मुनोत, मेघना मुनोत, शर्मिला गुगळे, गौतम मुथा, खुशबू मुनोत, आशिष पोखरणा, अभिजीत गांधी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केडगाव वेशीपासून देवी रोड मोहिनी नगर पर्यंत स्वातंत्र्य दिन उत्सवाची शोभायात्रा काढण्यात होती. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. लेझीम, झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. तिरंगे फुगे आकाशात सोडून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. तर आपल्या भाषणातून स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाला उजाळा दिला.

प्रास्ताविकात शाळेचे प्राचार्य आनंद कटारिया म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचे बलिदान न विसरता येणारे आहे. त्यांच्या बलिदानातून सुवर्णमय पहाट उगवली आहे. भविष्यातील सशक्त भारत घडविण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुलच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर संस्कार रुजविण्यात येत आहे. साधू-संत, महापुरुषांचे विचार संस्काराची रुजवून मुलांमध्ये केले जात असल्याचे सांगून त्यांनी शाळेच्या स्थापनेपासून ची सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची माहिती दिली.
जवाहर मुथा म्हणाले की, देशाला संस्कारक्षम पिढीची गरज असून, जे.एस.एस. गुरुकुलद्वारे दिले जाणारे संस्कारक्षम शिक्षण कौतुकास्पद आहे. शिक्षणाबरोबर मुलांचा व्यक्तिमत्व विकास देखील महत्त्वाचा आहे. व्यक्तिमत्व विकासाने जीवनात यश गाठता येणार आहे. यासाठी जीतोच्या माध्यमातून शाळेला सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर जीतोच्या माध्यमातून अमृत महोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेघना मुनोत यांनी भारत महासत्ता होण्यासाठी भावी पिढीने योगदान द्यावे. तर तणावमुक्त जीवन व नकारात्मक विचारातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशी मंत्री व वर्षा कार्ले यांनी केले. या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जितो कडून विद्यार्थ्यांना तिरंगा टोपी व खाऊचे वाटप करण्यात आले.
