• Mon. Jan 26th, 2026

बाराबाभळी मदरसेत स्वातंत्र्य दिनी गुंजला हिंदुस्तान जिंदाबाद! चा जयघोष

ByMirror

Aug 15, 2023

हातात तिरंगे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

कराटे व तायक्वांदोचे धाडसी चित्त थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदुस्तान जिंदाबाद!…., सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा!… या घोषणांनी मदरसाचा परिसर दणाणून निघाला. मदरसातील विद्यार्थी हातात तिरंगे ध्वज घेऊन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
प्रारंभी मदरसेमध्ये तिरंगा ध्वज फडकवून सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी नगरसेवक संजय घुले, अब्दुस सलाम, हाजी मन्सूर शेख, चेअरमन आसिफ शेख, सचिव मतीन सय्यद, हाजी शकिल अहमद चमडेवाले, हाजी इरफान शेख, हाजी इब्राहिम शेख, मदरसेचे प्रमुख (कारी) अब्दुल कादिर शेख, आयटीआयचे प्राचार्य नदिम शेख, हाजी इमरान, रिजवान शेख, तय्यब शेख, अब्दुल जब्बार, हाफिज बुऱ्हाण, मौलाना इसहाक आदींसह मदरसामधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मदरसामधील खेळाडूंनी यावेळी कराटे व तायक्वांदोच्या विविध धाडसी चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला. हातात तिरंगा ध्वज घेऊन मानवी मनोरे उभारण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सशक्त भारताचे दर्शन घडविले.


प्रास्ताविकात प्राचार्य कारी अब्दुल कादिर शेख यांनी विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणाबरोबर स्पर्धामय युगाच्या दृष्टीकोनाने शालेय शिक्षणासह कौशल्यपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देखील दिले जात आहे. विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्य गुणांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत हाजी मन्सूर शेख यांनी केले.
नगरसेवक संजय घुले म्हणाले की, समाजात पसरलेली जातीयवादी प्रवृत्ती गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करत आहे. ही सर्व प्रकरणे राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मुस्लिम विरोधात नव्हता, त्यांचा लढा स्वराज्यासाठी अन्यायाविरोधात होता. त्यांच्या सैन्यात अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम व्यक्तींकडे होती. द्वेषमय राजकारणाला खतपाणी न घालता सर्वांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.


अब्दुस सलाम म्हणाले की, सर्व जात, धर्म, पंथ एकत्र राहतात हेच भारताचे वेगळेपण व वैभव आहे. स्वातंत्र्य ब्रिटिशांविरोधात संघर्ष करून रक्त सांडून मिळवलेले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्व भारतीयांची बलिदान देण्याची तयारी आहे. इस्लाम धर्म हा शांतीचा व स्वतःच्या देशाप्रती प्रेम करण्याचा संदेश देतो. मात्र आजही काही सत्ताधारी ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज करा! ही रणनीती चालवत आहे. त्या विरोधात जागरूक होण्याचे त्यांनी सांगितले. तर जातीय द्वेष पसरविणे व माती भडकवण्यासाठी सुरु असलेल्या सोशल मीडियाच्या चूकीच्या संदेशापासून लांब राहून त्याला प्रतिक्रिया न देण्याचे त्यांनी युवकांना सांगितले. मदरसा मधील मुलांना कराटेचे शिक्षण देणारे प्रशिक्षक वसिम शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सार शहा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *