पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करणार सायबर क्राईमबद्दल जागृती
मिमिक्री कलाकार तथा अभिनेते आशिष सातपुते राहणार उपस्थित
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात नवोदित कवींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या काव्य संमेलनासाठी सायबर क्राईम मध्ये विशेष कार्य करणारे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे उपस्थित राहणार आहे.
नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये रंगणार आहे. या काव्य संमेलन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून मुंबई येथील मिमिक्री कलाकार तथा अभिनेते आशिष सातपुते आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. सातपुते विविध अभिनेते, राजकीय पुढारी यांचे हुबेहुब आवाज काढतात. साई बाबांची भूमिका देखील त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे समाजात वाढते सायबर क्राईम व फसवणुक रोखण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. तर सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापरामुळे समाजात निर्माण होणारी तेढ व युवकांवर गुन्हे दाखल होत असताना खबरदारी घेण्याबाबत युवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
