10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दि.15 ऑगस्ट) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार तर्फे नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी चांगले मार्केट व शेतातील मालाला चांगला भाव उपलब्ध करुन देण्यासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित केले असून, यामध्ये पाथर्डी तालुक्यातील श्रीकांत जाधव व सखुबाई जाधव या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहे.
महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या माध्यमातून 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत पाथर्डी तालुक्यातील श्री दक्षिनाधीश ॲग्रो फार्मर प्रोडुसर कंपनीतील तिसगावचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. गेली दोन वर्षापासून नाबार्ड व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सहयोगाने सदर कंपनीचे काम सुरु आहे.
कंपनीच्या माध्यमातून परिसरातील 750 शेतकरी सभासदाना बरोबर घेऊन डांळिब, संत्रा, मोसंबी व ज्वारी व सर्व प्रकारची मिलेट खरेदी विक्रीचे काम सुरु आहे. कंपनीने दिल्ली, कानपूर, बिहार, सिलगुडी येथील मंडी मार्केट व आयटीसी व रिलायन्स सारख्या कार्पोरेट मार्केट सभासदासाठी उपलब्ध करुन दिले आहे. तर शेतातील मालाला चांगला दर मिळून दिला आहे. कंपनी प्रतिनिधींची दिल्लीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण आल्याबद्दल नाबार्ड व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या तर्फे संचालक व सभासदाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
